बार्शी - आयटक संलग्न सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सहावे अधिवेशन बार्शीतील वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे दि. ८ व ९ नोव्हेंबर रोजी होत असल्याची माहिती कॉम्रेड तानाजी ठोंबरे व कॉम्रेड ए.बी.कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड तुकाराम भस्मे, अमरावती, कॉम्रेड नामदेव चव्हाण,बीड, सह कामगार आयुक्त मुजावर, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड ए.बी.कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होत आहे.   
    कामगारांची संघटना ही तळागाळातील अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांसाठी सातत्याने काम करीत आहे. अनेक कर्मचारी हे प्रामुख्याने दलित, मागास, अशिक्षीत, राजकिय व्यक्तींच्या दबावाखाली असतांना त्यांना एकत्र करुन न्याय हक्कासाठी लढा देण्यास शिकविणे हे अवघड होते परंतु प्रयत्नाने हे साध्य झाले त्यामुळे त्यांच्या अनेक प्रश्‍नांची सोडवणूक झाली. दलितांवरील हजारो वर्षांच्या गुलामगिरीचा पगडा आजही अनेक ठिकाणी दिसून येतो. मागील अनेक वर्षांचा अनुभव पाहता आमदार बच्चू कडू, आमदार गणपतराव देशमुख यांच्याशिवाय कोणत्याही आमदारांनी राज्यातील कर्मचार्‍यांसाठी विधानसभेत सक्षमपणे आवाज उठवला नाही. मागील तीस वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍नासाठी संघर्ष करत असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यात या संघटनेच्या शाखा आहेत. सुमारे पंधराशे सभासद असलेल्या संघटनेने यापूर्वी किमान वेतन, महागाई भत्ता, बढतीमध्ये राखीव जागा, नोकरीची सुरक्षितता, दरमहा बँकेतून वेतन, वेतनाला अनुदान इत्यादी प्रश्‍न सोडविले आहेत. विविध प्रश्‍न सोडविल्याने ही संघटना मजबूत झाली आहे, याप्रमाणेच इतर आवश्यक मागण्यांसाठी संघटना प्रशत्नशील आहे.
    ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना जिल्हा परिषद कर्मचार्‍यांत समावेश करणे, वेतनश्रेणी, भविष्यनिर्वाहनिधी, कालबाह्य आकृतीबंधाची जाचक अट रद्द करणे, कर्मचार्‍यांन घरकुल मिळवून देणे, कर्मचार्‍यांना प्रबोधन करुन सक्षम बनविणे यासाठी यापुढील काळात संघटना काम करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 
Top