बार्शी -  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या ५४ व्या राज्यस्तरीय हौशी मराठी नाट्य स्पर्धा सुरु आहेत. बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन केंद्रातील स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी सोलापूर येथील बनशंकरी बहुउद्देशीय मंडळाने स्व.पु.ल. देशपांडे लिखित दोन अंकी नाटक एक झुंज वार्‍याशी सादर केले.
    यात चार पात्रांचे संवाद दर्शविण्यात आले. यातील भूमिका राजू गायकवाड (सामान्य माणूस), प्राणेश पाटील (डॉ.चौधरी), रत्नाकर जाधव (डॉ.देशमुख), कश्मिरा गायकवाड (पत्रकार आनंद वाठारकरांची पत्नी चित्रा) यांनी अभिनय केला. दिग्दर्शन रत्नाकर जाधव, नेपथ्य मकरंद जाधव, अविनाश तमनूर, पार्श्‍वसंगीत चेतन देडे, प्रकाशयोजना अमोल कुलकर्णी, रंगभूषा शांता येळंबकर व सहकार्‍यांनी साकारले आहे.
     याच्या कथानकात आनंद वाठारकर या तत्वनिष्ठ व इमानदार पत्रकाराच्या लिखानामुळे प्रगतीपथावर जाणार्‍या डॉक्टर चौधरी व देशमुख यांना अडसर ठरतो त्यामुळे पत्रकाराचे जीवन संपवून टाकणारी घटना घडते. त्यानंतर विविध अडचणीतील नागरिकांसाठी जीवन समर्पित केलेल्या सामान्य माणसाच्या समजावण्यामुळे डॉक्टर देशमुख यांना जीवनातील खरा मार्ग सापडतो व नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे त्यांची वाटचाल सुरु होते व त्यांना मानवधर्म व कर्तव्याची जाणीव होते.
   
    डॉ.चौधरी व डॉ.देशमुख (हृदयरोगतज्ञ) हे वैद्यकिय व्यवसायाचे शिक्षण घेतात. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत असलेल्या दवाखान्यात त्यांची प्रॅक्टीस सुरु होते. या ठिकाणी त्यांच्याकडे कोणताही अनुभव नसल्याच्या कारणास्तव त्यांच्याकडे रुग्णांचा ओढा नसतो. डॉ.देशमुख यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्यांची पत्नी स्वत:च्या हृदयावर प्रयोग करा व अनुभव घ्या असे म्हणत स्वत:च्या जीवाची बाजी लावते. त्यानंतर हळूहळू रुग्णांची रेलचेल वाढते. डॉ.देशमुखांचे सहकारी डॉ.चौधरी हे दवाखाना चांगला चालण्याची एक क्लृप्ती तयार करतात. हृदयरोग असलेल्या अनेक रुग्णांपैकी ज्यांची ऑपरेशननंतर वाचण्याची शक्यता असेल त्यांची निवड करुन त्यांच्यावर उपचार करणे व ज्यांची शक्यता नसेल त्यांना इतरत्र जाण्याची वेळ आणून स्वत:च्या दवाखान्याचा गवगवा करुन विविध पुरस्कार मिळवतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठीही निवड होते. पुरस्कार जाहीर झालेल्या डॉक्टर देशमुख यांची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या पत्रकार आनंद वाठारकर यांना त्या दवाखान्यात हृदयरोगाने मरणासन्न अवस्थेतील रुग्ण उपचाराविना मृत्यूच्या दाढेत असल्याचे व त्यांना उपचाराविना मृत्यूच्या दाढेत ढकलून दिल्याचे दृश्य दिसते. त्याला रुग्णाच्या नातेवाईकांच्या मदतीने डॉ.देशमुखांच्या गुरुकडे नेले जाते. त्यांच्याकडून त्या रोग्याचा जीव वाचतो. आनंद त्याचा मागोवा घेऊन इतर रुग्णांचीही सखोल चौकशी करतो. सदरच्या डॉक्टराकडून केल्या जाणार्‍या उपचाराची व त्यांच्या विकृतीची माहिती झाल्यानंतर चांगल्या दैनिकासाठी एक सणसणी लेख तयार करतो. सदरच्या लेखामध्ये डॉक्टरांचे खरे रुप व वस्तूस्थितीचे दर्शन दिसून येते. सदरच्या लेखाचे प्रकाशन होण्यापूर्वीच आनंद डॉक्टरास सदरच्या लेखाविषयी कल्पना देतात त्यामुळे डॉ.चौधरी व डॉ.देशमुख आनंद निर्व्यसनी असतांनाही वृत्तपत्राच्या संपादकांना दारुड्या असल्याचे सांगतात. आनंदला एका गरीब गरजू रुग्णावर उपचार करण्याच्या बदल्यात त्याच्याकडून लेखाचे मुद्रण थांबविण्याचे व त्यातील मजकूर खोटा असल्याचे पत्र लिहून घेतात व स्वत:ची बदनामी होणारे लिखान थांबवितात. सदरच्या प्रकारानंतर आनं
द यास वृत्तपत्रातील नोकरीवरुन काढण्यात येते तर शासनाच्या पुरस्कारानंतर डॉक्टर देशमुख यांची भरभराट होते पुढे राजकिय पाठबळ मिळून मंत्रीपदही मिळते तर त्याची नेहमी साथ देणार्‍या डॉ.चौधरीला सेक्रेटरी म्हणून घेण्यात येते. पाच सहा वर्षांच्या काळानंतर कुटूंब उध्वस्त झालेल्या पत्रकार आनंद याची माहिती काढून सामान्य माणसाच्या भूमिकेतील समाजसेवक त्याच्या मदतीला धावून येतो व त्याच्या संपूर्ण घटनेचा बारीक अभ्यास करुन चित्रासोबत त्या विकृत डॉक्टरांची भेट घेतो. यावेळी त्यांच्यातील प्रदिर्घ संवादातून संपूर्ण कथानक उलगडले जाते यात डॉक्टर चौधरीतील पशू उघडा पडतो. तर डॉक्टर देशमुख यांना खरा प्रकार समजून यांचे मन आणि मतपरिवर्तन होऊन आदर्श डॉक्टरात झालेले परिवर्तन हा त्याच्या कलाटणी देणारा प्रसंग दोन अंकी नाटकाची सांगता करतो.
 
Top