उस्मानाबाद -  राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गच्या जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत सर्व यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. ज्याठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले आहे, त्याठिकाणी संबंधिकांना निवाडे देण्याचे काम वेळेवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राष्ट्रीय रस्ते महामार्गासाठी करण्यात येत असणाऱ्या भूसंपादनासंदर्भातील सर्व कागदपत्रे स्कॅनिंग करावेत तसेच महामार्ग संदर्भातील भूसंपादन प्रकरणातील वाद परस्पर तडजोडीने मिटविण्याबाबत या महिन्यात संबंधित यंत्रणा आणि भूधारकांची बैठक लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी रस्ते महामार्गाबाबतच्या भूसंपादन कामांचा आढावा घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी बी. एस. घुगे, उपजिल्हाधिकारी बी. एस. चाकूरकर, उस्मानाबाद, कळंब, भूम आणि उमरगा येथील उपविभागीय अधिकारी सर्वश्री अभिमन्यू बोधवड, सचिन बारवकर, संतोष राऊत आणि रवींद्र गुरव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर राष्ट्रीय रस्ते महामार्गचे प्रकल्प संचालक बी.बी. ईखे आणि श्री. जिरंगे यांच्यासह कृषी, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. नारनवरे यांनी राष्ट्रीय महामार्ग 9 आणि 211 यासाठीच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. ज्या यंत्रणांनी अद्याप यासंदर्भातील कामे प्रलंबित ठेवली असतील त्यांनी ती तात्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. भूसंपादनाचे काम हे यातील विविध यंत्रणांच्या परस्पर समन्वयावर अवलंबून असल्याने प्रत्येकाने वेळेत काम पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. भूसंपादनासंदर्भातील महिनाअखेरपर्यंत प्रलंबित प्रस्ताव राहणार नाहीत, अशा पद्धतीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  काहीवेळा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  संबंधित भूधारकाकडून रक्कम मागणीबाबत दावे केले जातात, त्यामुळे सर्वेक्षण करतानाच व्हिडीओग्राफी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  
 
Top