बार्शी -  मराठा समाजाच्या आरक्षणाठी एका हाकेवर इतक्या मोठ्या संख्येने जमाव जमला ही जमेची बाजू आहे. आरक्षणाच्या लढाईची ही पहिली यशस्वी पायरी आहे. यापुढील काळात तलवार बंदुका हातात घेण्याची वेळ आली तरी कोणत्याही स्तरावर लढू व शासनाला नमवू असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर फरताडे यांनी केले.
    बुधवारी बार्शीतील संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने बार्शी तहसिलवर मोर्चा काढून तहसिलदार बालाजी सोमवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेल्या मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे, रास्ता रोको इत्यादी मार्गाने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बार्शीत देखिल त्याचे पडसाद उमटले असून त्याचाच एक भाग म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
   
    यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अनंद काशीद, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष मधुकर फरताडे, उपाध्यक्ष किरण गाढवे, पर्यावरण मित्र मधुकर डोईफोडे, संभाजी घाडगे, तुकाराम पाटील, सोमनाथ खोडवे, अमोल नवले, आनंद गवळी, सदानंद आगलावे, सागर मोरे, अंकुश कंगले, संतोष रणपिसे, बालाजी डोईफोडे, पांडूरंग यादव, सचिन गुंड, राहुल चित्राव, दिपक गुंड, समाधान कागदे, विनोद वाणी, बाळराजे जाधव, शांतीलाल काशीद, नितीन पवार, संतोष भोसले आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद म्हणाले, मराठा रक्षणाचा लढा यापुढे अधिक गतीमान करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही जणांकडून समाजाला मध्येच मिसगाईड करण्याचा प्रयत्न झाला, काही गोष्टींचा बाऊ करुन समाजाला मिळणारी अर्धी भाकरी हिसकावून घेण्याचा प्रकार झाला. सरकारने समाजाची बाजू कमकूवतपणे मांडल्याने न्यायालयातून योग्य न्याय मिळाला नाही. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांना जागृत करण्याचे काम सुरु केले आहे. संघटनेच्या माध्यमातून कसल्याही पध्दतीने आम्ही शासनावर दबाव आणून निर्णय घेण्यास भाग पाडू. शासनाने जानेवारीपर्यंत योग्य निर्णय न घेतल्यास शहर बंद व रास्ता रोको आदी पध्दतीने आंदोलने करण्यात येतील.
       
    याप्रसंगी बोलतांना मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष किरण गाढवे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाची स्थगिती ही चुकीच्या पध्दतीने, कुचकामी भुमिका मांडल्याने मिळाली ,असा सर्व समाजाचा रोश आहे, याप्रसंगी आज स्थगिती मिळाल्यामुळे सर्व समाज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणामुळे मुख्य प्रवाहात येणारा समाज जर आरक्षण नाकारल्यामुळे दूर राहीला तर शासनाला ही भूमिका अत्यंत महागात पडेल. अशा पध्दतीची तमाम मराठा समाजामध्ये भावना आहे. याचा विचार करुन प्रभावीपणे अंमलबजावणी तात्काळ करावी. अतिशय रास्त भूमिका मांडावी अशी मागणी असल्याचे यावेळी सांगीतले.रवि पर्यावरणचे मधुकर डोईफोडे म्हणाले, एकाच आईच्या लहान मोठ्या दोन मुलांमध्ये शारिरीक उंचीमुळे मोठ्या मुलास लाडूच्या डब्यापर्यंत हात घालून सहजपणे लाडू खाता येतो, तर छोटासा बाकडा देऊन त्याची आई दुसर्‍या मुलासही लाडूपर्यंत पोहोचविते व दोन्ही मुलाला आनंदी ठेवते त्याप्रमाणे विकासापासून वचित समाजाला शासनाच्या वतीने आरक्षणाच्या माध्यमातून विकासाकडे नेण्याचा प्रयत्न होतो. या आरक्षणाचा उपयोग हा मराठा समाजातील आर्थिक मागास घटकांना होणार असल्याने त्याला मान्यता मिळावी.
    अमोल नवले म्हणाले, मागील २०-३० वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी अखंडपणे लढा सुरु होता. आणे समितीच्या वतीने या लढ्याला अल्पसे यश मिळाले होते. निवेदनाद्वारे शासनाला विनंती करण्यात येते की, येणार्‍या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा मराठा समाजाच्या रोशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
 
Top