सोलापूर -  जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येवून समन्वयाने काम करावे. जिल्ह्याचा मानव विकास निर्देंशांक कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय अधिका-यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढीसाठी, आरोग्य सुविधा, शिक्षण, दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. यासाठी रोजगार निर्मिती वाढीसाठी काय करु शकतो याचा विचार करावा. यासाठी उदा. जिल्हा उद्योग केंद्र, व्यवसाय शिक्षण विभाग, तंत्र शिक्षण आदी विभागांनी एकत्र येवून कौशल्य विकसित करावे. विविध विभागाच्या समन्वयातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे. यावार लक्ष केंद्रीत करुन सर्व विभागांचा कालबध्द कार्यक्रम आखावा अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थींना मिळाला पाहिजे. या योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर परिणामकारकरित्या पोहोचल्या पाहिजेत, यासाठी मी काय करु शकतो याचा विचार करुन आपला सहभाग द्यावा. सर्वांनी एकत्रित समन्वयाने, संवेदनशीलपणे काम केले तर चांगले काम होवू शकते असे प्रतिपादन श्री. मुंढे यांनी केले.
यासाठी मागील 5 वर्षात आपण काय केले आहे याचा आढावा घेतला जाईल. तसेच चालू वर्षी उद्दिष्ट काय आहे, आत्तापर्यंत काय साध्य झाले आहे, काय साध्य होणार आहे, आपल्या विभागाचे उद्दिष्ट काय आहे ते साध्य करण्यात किती यशस्वी झालो आहोत याचा आढावा घेवून नियोजन केले जाईल. तसेच याबाबतचा नियमित आढावा घेणार असल्याचेही जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी विविध अधिका-यांकडून विकास कामाबाबत माहिती जाणून घेवून कामामध्ये अडचण असल्यास नेहमी मदत केली जाईल. तसेच पुढील आठवड्यात विविध विभागाच्या सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
 
Top