उस्मानाबाद - संस्थानांचे विलीनीकरण करुन देश अखंड ठेवणारे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी अथक प्रयत्‍नांची पराकाष्ठा करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांमुळेच आजही देश अखंड आहे, असा सूर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात विविध मान्यवरांनी व्यक्त केला.
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन म्हणून पाळण्यात आला. त्यानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सरदार पटेल यांचे राष्ट्रीय ऐक्यासाठीचे योगदान विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात देविदास वडगावकर, डॉ. सतीश कदम आणि डॉ. गोविंद कोकाटे यांनी आपले विचार मांडले. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, तहसीलदार सुभाष काकडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी शिस्तप्रिय, कणखर आणि उत्तम प्रशसक असणा-या सरदार पटेल यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा संदर्भ दिला. उत्तम प्रशासनासाठी नागरी सेवांची गरज आणि त्यासाठीची प्रशासकीय यंत्रणा ही सरदार पटेल यांच्यामुळेच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
देशाने गेल्या 65 वर्षात जर काही कमावले असेल, तर ते आहे राष्ट्रीय एकात्मता. हे केवळ सरदार पटेल यांच्यामुळेच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. कदम यांनी हैद्राबाद संस्थान विलीनीकरणाचे संदर्भ देत सरदार पटेल यांच्या आयुष्यातील घटनांचा उल्लेख केला. डॉ. कोकाटे यांनी राष्ट्रीय एकात्मता म्हणजे जात-धर्मभेद विरहीत समाज असे वर्णन करुन ख-या अर्थाने सरदार पटेल हे त्याचे प्रतिक होते असे सांगितले.विधीज्ज्ञ वडगावकर यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा राष्ट्रीय एकतेशी खूप निकटचा संदर्भ असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार पटेल आणि माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप भ्रष्टाचाराविरोधी शपथ घेऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले. उपविभागीय अधिकारी बोधवड यांनी आभार मानले. 
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातही सरदार पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करुन आणि पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर व अरविंद लाटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एस. घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे, तहसीलदार शिवकुमार स्वामी व श्रीमती मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.     
 
Top