बार्शी - बार्शी शहरातील तीनचाकी ऍटोरिक्षा चालकांवर नाहक कारवाई होत असल्याने चालकांनी जिल्हाधिकारी व आरटीओ कार्यालयाकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. रिक्षाचालकांना नाहक त्रासातून मुक्त करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.
    बार्शी शहरात मागील अनेक दिवसांपासून मोठ्या वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे शहरातील वाहतुकीची कोंडी होत आहे. बार्शी शहरात अनेक तीनचाकी वाहनांना शासन मान्यतेचे परवाना पत्रक मिळाले आहे. इतर रिक्षांचालकांची परवान्यासाठी मागणी प्रलंबीत आहे. शहरातील सर्व रिक्षाचालक हे वाहतुकीचे सर्व नियमांची अंमलबजावणी करत आहेत. सर्व परवानाधारक रिक्षाचालकांना नियमानुसार लायसन बॅच, कादपत्रे इत्यादी सोबत ठेवले जाते. सर्व वाहनांचे प्रदुषण चाचण्या करुन त्याचा परवाना घेण्यात येतो. वाहनाशी संबंधीत सर्व ती खबरदारी व ग्राहकांना नियमानुसार दरांची आकारणी करण्यात येते. कोणत्याही ग्राहकांची तक्रार येऊ न देता दवाखाने इत्यादी ठिकाणी अडचणीतील असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या प्रकारचे सहकार्य करण्यात येते. मागील काही दिवसांपासून बार्शी वाहतूक पोलिसांकडून रिक्षाचालकांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. रिक्षाचालकांजवळ असलेल्या कागदपत्रांची पाहणी न करता, कोणत्या प्रकारचा नियम तोडला याची कल्पना खातरजमा न करता दंडाची पावती भरुन हातामध्ये देण्यात येते व आमचे उपजीवीकेचे वाहन असलेल्या रिक्षाला पोलिस ठाण्यात नेऊन लावण्याचे प्रकार घडत आहेत. सदरच्या प्रकारामुळे हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांवर नाहक खर्चाची भुर्दंड, वेळेचा अपव्यय व विनाकारण केसेस होत असून यामुळे सर्व त्या नियमांचे पालन करणारांना मानसिक त्रास होत आहे. ज्या वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होते त्यांना राजकिय वरदहस्त असल्याने त्यांना सोडून देण्यात येते तर आमच्यासारख्या गरीब रिक्षाचालकांना नाहक त्रास होत आहे. सदरच्या प्रकरणी बार्शीतील वाहतूक पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
 
Top