उस्मानाबाद -   जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात आता जिल्हा प्रशासनाने कडक पवित्रा घेतला आहे. एकीकडे अशा अवैध सावकारांसंदर्भात तक्रार आल्यास कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सहकार विभागाला दिले आहेत. याशिवाय, परवानाधारक वैध सावकारांचीही विशेष बैठक बोलावून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्या आणि कायदेशीर मार्गानेच व्यवहार करा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
    जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सहकार विभागाचे सर्व तालुका निबंधक, परवानाधारक सावकार यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक (सहकार) एस.पी. बडे यांची उपस्थिती होती.
    जिल्हा प्रशासनाने अवैध सावकारी विरोधात कठोर कार्यवाहीचे निर्देश सहकार विभागाला दिले आहेत. त्यादृष्टीने तालुका पातळीवर अशा प्रकारे सावकारी करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी आणि संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. अवैध सावकारीप्रकरणात शेतकरी किंवा सर्वसामान्य नागरिकांची तक्रार आल्यास अशा प्रकरणी चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही डॉ. नारनवरे यांनी दिले आहेत.
एकीकडे ही पावले उचलली जात असतानाच डॉ. नारनवरे यांनी परवानाधारक सावकारांची बैठक बोलावून त्यांनाही सर्वसामान्यांची अडवणूक होणार नाही, अशा पद्धतीने कारभार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपल्या कायदेशीरदृष्ट्या केल्या गेलेल्या व्यवहाराबाबत प्रशासनाला काहीही अडचण नाही, मात्र, प्रत्येक व्यवहारात कायदेशीर बाबींचे पालन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी डॉ. नारनवरे यांनी परवानाधारक सावकारांचेही म्हणणे ऐकून घेतले. यावेळी सावकारांनी त्यांच्याविरोधात तक्रार आली की, पोलीसांनी सर्वप्रथम सहकार विभागाला कल्पना देऊन आमची बाजू समजावून घ्यावी, जेणेकरुन परवानाधारक सावकारांना कोणताही त्रास होणार नाही, अशी मागणी केली. त्यावर या बाबतीत सहकार विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी दिल्या.
या बैठकीसाठी जिल्ह्यातील बहुतांशी सावकार उपस्थित होते.
 
Top