बार्शी -  येथील ज्येष्ठ विधीज्ञ कै.गंगाधर सोपल स्मृती राज्यस्तरीय विधी सेवा पुरस्कारासाठी तीन विधीज्ञांची निवड करण्यात आल्याची माहिती आयोजक ऍड्. विकास जाधव यांनी दिली. पुरस्कार वितरणाचे हे दुसरे वर्ष असून यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे दि. ६ डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी ऍड्.भास्करराव आव्हाड (पुणे), ऍड्. आशुतोष कुंभकोणी (मुंबई), ऍड्. अविनाश देशमुख (धाराशिव-उस्मानाबाद) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते व बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे व्हाईस चेअरमन ऍड्.बळवंतराव जाधव, माजी चेअरमन ऍड्.मिलींद थोबडे, नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात येत आहे.
    अॅड्.विकास जाधव म्हणाले, कै.गंगाधर सोपल यांच्या विधीक्षेत्रातील योगदानाचे चिरंतन स्मरण व्हावे. युवा विधीज्ञांना त्यागी व बुध्दीमंत विधीज्ञांच्या विचार चरित्रातून प्रेरणा मिळावी, नामवंत विधीज्ञांच्या कार्याची माहिती, विधी क्षेत्रातील नवनवीन प्रवाहांसोबत विचारमंथन व्हावे, वैचारिक देवाणघेवाण व्हावी, विधी क्षेत्राचे पावित्र्य प्रतिष्ठा वाढावी, विधीज्ञांच्या हक्क व कर्तव्याची जागृती होण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन मागील वर्षापासून केले आहे.
 
Top