वैराग (महेश पन्‍हाळे) आपल्या तळपत्या बॅटने पूर्ण क्रीडा विश्‍वावर अधिराज्य गाजवणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी इर्लेवाडी (ता. बाश्री) येथील शाळेला वर्ग खोल्या बांधण्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देऊन विद्यार्थी वर्गाच्या मनावरही अधिराज्य निर्माण केले आहे. ज्या सचिनला टीव्ही आणि पेपरमध्ये पाहत आलो, त्याच सचिन तेंडुलकर यांनी इर्लेगावासाठी स्वत:चे योगदान दिल्याने इर्लेकरांचा उत्साह चांगलाच दुणावला आहे.
        तीन हजार लोकसंख्या असलेल्या इर्ले- इर्लेवाडी गावाकरिता श्री छत्रपती राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळाने १९९७ साली कै. लक्ष्मणराव डुरे-पाटील नावाची प्रशाला स्थापन केली. या शाळेत इर्ले, इर्लेवाडी, काळेगाव वस्ती व वस्तीगृहातील अशी ११७ मुली व १२५ मुले मिळून २४२ मुले शिक्षण घेत आहेत. सर्व सोयीनीयुक्त संगणकीय असलेली ही शाळा क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्यात नावाजलेली आहे. या सर्व गोष्टींसोबत राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यसभेतील खासदार सचिन तेंडुलकर यांच्या फंडातून पंधरा लाखांचा निधी या शाळेसाठी उपलब्ध झाल्याने शाळा आगळ्यावेगळ्या रुपाने प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. प्रशालेला नवीन वर्ग खोल्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर डुरे-पाटील यांनी १६ जुलै २0१३ रोजी खासदार सचिन तेंडुलकर यांना पत्र पाठविले होते. त्यानंतर त्या पत्राचा पाठपुरावा करण्यासाठी १८ जुलै २0१४ रोजी दुसरे पत्र पाठवले. या पत्राची दखल घेत स्वत: सचिन तेंडुलकर यांनी इर्लेवाडीसाठी सन २0१४-१५ च्या खासदार निधीतून १५ लाखांचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबतचे एक लेखी पत्र मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीला खासदार सचिन तेंडुलकर यांनी दिले आहे. त्याची एक प्रत संबंधित शाळेला व सोलापूर जिल्हा नियोजन समितीलाही प्राप्त झाली आहे. क्रिकेट विश्‍वाचा देव म्हणून जगविख्यात सचिन तेंडुलकरला सर्वांनीच संमती दिली आहे. ज्यावेळी तो खेळायचा त्यावेळी आपल्या खेळातून कर्तृत्व व्यक्त करीत होता. आता खासदार बनल्यापासून ते आपल्या विकास कामातून कर्तव्य बजावत आहेत. आजपर्यंत किती खासदार आले - झाले, पण पूर्ण वेळ व्यस्त असताना लहान गोष्टीचे मोठे महत्व ओळखत सोलापूर जिल्ह्यात निधी उपलब्ध करुन देणारे पहिलेच बिगर राजकीय सेलिब्रिटी ते ठरले आहेत. आपल्या मितभाषी स्वभावाने, चेहर्‍यावर सतत हास्य फुलवणार्‍या, नेहमी झुंज देत लढणारा शतकांचा बादशहा क्रिकेट विश्‍वातून नवृत्ती स्वीकारल्यानंतरही रसिकांच्या मनातून कधीही दूर गेला नाही. त्यात शैक्षणिक क्षेत्रात कशाचाही गवगवा न करता भरीव आर्थिक मदत देऊन सोलापूर जिल्ह्याच्या मनात कायमचेच घर निर्माण केले आहे
         खासदार सचिन तेंडुलकर यांच्या कार्यकर्तृत्वाची जवळून ओळख व्हावी व विद्यार्थीदशेतच महान खेळाडूचे महानपण लक्षात यावे, यासाठी पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे आमच्यासारख्या साध्या माणसांची दखल घेतली जाईल असे वाटले नव्हते. पण या घटनेनंतर खरंच सचिन हे मनानेही मोठे असल्
      महान क्रिकेटपटू सचिनने छोट्याशा गावात निधी देऊन जे मोठे काम केले आहे, त्याचे स्मरण आमच्या इर्लेकरांच्या कायम स्मरणात रहावे. यासाठी सचिनच्या प्रेरणास्तव हायस्कूलमध्ये संग्रहालय बनवणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष सुभाष डुरे-पाटील यांनी सांगितले.
    खासदार सचिन तेंडुलकर यांच्या निधी उपलब्धतेची झेरॉक्स प्रत सोलापूर जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाली असून, मूळ प्रत मुंबई उपनगर कार्यालयाकडे आहे. त्यादृष्टीने मुंबई कार्यालयाशी पत्रव्यवहार झाला असून आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर या शाळेस निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत म्हेत्रे यांनी दिली.
याची साक्ष पटली, असे शाळेचे मुख्याध्यापक किशोर डुरे-पाटील यांनी सांगितले.
 
Top