बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) आरटीओ कार्यालयाचे अधिकारी अंकुश पाटील व रोहन पांडकर यांनी बेशिस्त बार्शीकर व मध्यस्तींना चांगलेच खडसावले असून बार्शीतील शिबीरात त्यांना चांगली शिस्त लावण्याचे काम केले आहे. बार्शीतील वाहन परवाना शिबीरासाठी अधिकारी आल्यानंतर त्यांना परवान्यासाठी आलेल्या वाहनधारकांचा गोंधळ, गोंगाट, बेशिस्त, अरेरावी, मध्यस्ती दलालांची लुडबूड, महिलांची गैरसोय, धक्काबुक्कीचे प्रकार व कायदा सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असल्याचे किळसवाणे चित्र दिसून आले. काही प्रसंगी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून येताच त्यांनी पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संभाषण केले. वरिष्ठ अधिकार्‍यांशीही संपर्क साधून परिस्थितीचे वर्णन सांगीतले. त्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके कारण शोधून त्यांनी वाहन चालकांना व वाहनधारकांना चांगली शिस्त लावण्याचे काम केले आहे.
    गोंधळ व गर्दीचे नेमके कारण काय :   
    काही दिवसच आपणाला वाहन चालकासाठी लागणारा शिकाऊ परवाना मिळणार आहे यापुढे संगणकाचा वापर करुन, अत्यंत अवघड परिक्षा देऊनच वाहन परवाना देण्यात येणार आहे. लवकर आपले परवाने काढून घ्या यानंतर सोलापूर येथेच दाखले मिळणार आहेत अशा प्रकारचे गैरसमज पसरल्यामुळे वाहन परवाना शिबीरात मोठ्या प्रमाणात गर्दीचे स्वरुप झाले होते. दलालांनी व संबंधीत अनाधिकृत मध्यस्तांनी प्रत्येकांना वेगवेगळ्या प्रकारच्या भिती दाखवून लुबाडण्याचे प्रकार सुरु केले. अनेकांना मध्यरात्री दोन वाजलेपासून रांगेत बसविले व मोठी गर्दि करुन अधिकार्‍यांवर दबाव टाकण्याचे प्रकार घडले. शासनाने वाहन परवान्याशी संबंधीत व्यवहार अत्यंत पारदर्शक होण्यासाठी, परवान्यातील कोणाच्या नावांमध्ये चुका राहू नये, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यासाठी इंटरनेटवरुन आपली योग्य माहिती व आपल्याला सोयीस्कर वेळ मिळण्यासाठी सुविधा सुरु केली आहे. योग्य त्या प्रारुपातील माहिती व संबंधीत कागदपत्रांचे पुरावे जोडून प्रत्यक्ष भेटण्याच्या दिलेल्या वेळेत नागरिकांची कामे केली जाणार आहेत. सर्वसामान्य व ग्रामीण भागातील नागरिकांचीही वेळेची बचत होणार असून कसल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास न ठेवता आपण संगणकाचा वापर करुन इंटरनेटवरुनही आपली भेटीची वेळ घेऊ शकता. यावेळी शिधापत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला आदी सर्व जोडलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीही (ओरीजनल ) बरोबर असणे आवश्यक आहे.
इंटरनेटवरुन परवान्यासाठी आपली भेट कशा प्रकारे निश्‍चित कराल :
    (www.sarathi.nic.in) (issue of a learning licences to me) (submit ) (your application is saved successfully)
इंटरनेटच्या सारथी डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावरुन इश्यू ऑफ अ लर्गिंग लायसेंस टू मी या टॅगवर क्लीक करा. यावरील आपल्याला विचारण्यात आलेली माहिती भरुन व सबमिट या टॅगवर क्लिक करा. यावेळी युवर ऍप्लीकेशन इज सेव्हड सक्सेसफुली असा संदेश आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल. यानंतर प्रिंट या ऑप्शनवरुन आपली प्रिंट घरबसल्या अथवा आपल्याला सोयीस्कर असलेल्या ठिकाणी काढून घ्या. आपल्याला सुचविलेल्या वेळेत संबंधीत कामे केली जाणार आहेत.
 
Top