बार्शी (मल्लिकार्जुन धारुरकर)  बार्शीची माती जरा वेगळीच आहे, बार्शीच्या मातीने आजपर्यंत अनेक प्रतिभावंत कवि, शिघ्रकवी, गायक, संगीतकार, नटसम्राट, साखरसम्राट, शिक्षणसम्राट, क्रिडासम्राट, अभिनेते, शाहिर, लेखक, पत्रकार, कलाकार, वाकपटू, बुध्दीबळपटू, कुस्तीगीर, अधिकारी, राज्यकर्ते, समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी, सैनिक, कृषि संशोधक, शिक्षागुरु, दिक्षागुरु, धर्मगुरु, पंडित, पुरोहित, वैद्यकिय अधिकारी घडविले आहेत. बार्शी तालुक्याला लाभलेल्या विस्तीण ग्रामीण भागातून विविध कलांची जोपासना करणारे कलाकार दिसून येतात. त्या कलाकारांची जडणघडण, त्यांचे व्यवहारज्ञान, सतत ओढवणारी परिस्थिती पाहिल्यास एक प्रकारची काळजी व खंत वाटते. देशपातळीवरील अनेक राज्यांतील अथवा महाराष्ट्रातील कलाकारांच्या परिस्थितीत भिन्नता दिसून येत असली तरी जवळपास सारखीच दिसून येते. खरी कला ही सरावाने निर्माण करता येत नाही ती अंतर्भूतच लागते. अशा कलाकारांना ती एक प्रकारची ईश्‍वरी देणगीच असते. कलेच्या बाबत ईश्वरी देणगी मिळाली तरी त्यांच्या आर्थिक सुधारणेत मात्र एक प्रकारचा शाप मिळाल्यासारखी परिस्थिती ओढवते. नमुन्यादाखल उदाहरण द्यायचे झाल्यास बार्शीतील मदन देगावकर (दंदाडे) नावाचा कलाकार संगीत, गायन, कविता, लेखन, संशोधन आदी छंद जोपासत आहे. वयाच्या ५ वर्षापासून शास्त्रीय संगीत, भागगीत, भक्तिगीत, हार्मोनियम वादन याचे धडे गिरवत आहे. आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम, विविध साहित्य संमेलने, मराठी वाद्यवृंद संघातून काम, कवि संमेलने, गायनाचे कार्यक्रम, एकांकिका स्पर्धांतून सहभाग, निबंध लेखन, वृत्तपत्र लेखन करुन त्याने संगीत विशारद पदविका प्राप्त केली. अष्टपैलू कलेच्या जोरावर त्याला आजपर्यंत अनेक पुरस्कार, स्मृतीचिन्हे, प्रमाणपत्रे, पारितोषिके मिळाली आहेत. आजवर त्याने वृत्तपत्र वितरण, गवंड्यांच्या हाताखाली अशी कामे करुन जीवनात संघर्ष केला आहे. कलेची आवड असली तरी सध्या एका वृत्तपत्रात तो काम करीत आहे. आतापर्यंत त्याला शामराव देशपांडे, अनिल गेळे, अय्याज शेख, भालचंद्र राजगुरु, शब्बीर मुलाणी, बसवराज पुरवंत, रामचंद्र इकारे, गुरुदत्त कुलकर्णी, अबोली सुलाखे, वर्षा रसाळ आदींनी मार्गदर्शन केले. आतापर्यंतच्या अनुभवाचा उपयोग करत महात्मा फुले यांच्या अखंडाचे गायन करण्याचा मानस त्याने व्यक्त केला असून महात्मा फुलेंच्या वेगळ्या प्रकारच्या लिखानाला संगीताची जोड देऊन त्याची आवड निर्माण करण्याचा त्याचा अत्यंत वेगळा प्रयत्न आहे.
    तुकारामांचे अभंग, ज्ञानेश्वर अन बहिणाबाईंच्या ओव्या, महात्मा बसवेश्वरांची वचने, कबीरांचे दोहे, एकनाथांची भारुडे, अनेक संतांची भजने, गीत रामायण जसे प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी लिहीलेले साहित्य अखंड म्हणून प्रसिध्द आहे. अखंडाला संगीत व योग्य आवाजाची साथ देऊन पुरंदर तालुक्यातील खानवडी या महात्मा फुलेंच्या जन्मगावी जाहीर कार्यक्रमातून त्याचे प्रसिध्दीकरण करण्यात येणार आहे. कलेच्या क्षेत्रात ग्रामीण भागातील कलाकार वेगळ्या प्रकारची निर्मिती करण्यापर्यंत उंचीचे शिखर गाठत असतांना अशा प्रकारच्या कलाकारांना येणार्‍या चांगल्या वाईट अनुभव, आर्थिक परिस्थितीच्या नाजुक विषयावर चर्चा करतांना त्यांनी अशा अनेक कलाकारांची खंत व्यक्त केली. त्यामुळे सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्ही एकत्रपणे दिसून येत नसल्याची म्हण खरी आहे की काय असे वाटायला लागते.   
    जुने अविट, कर्णमधुर संगीत यांच्यावर संशोधन विद्यापीठांच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. विविध प्रसारमाध्यमांची संख्या वाढत असल्याने कलाकारांना प्रोत्साहन व वाव मिळण्याची शक्यता वाढली आहे. बार्शी सारख्या ठिकाणचे वातावरण पाहता चांगला श्रोता, तज्ञ मार्गदर्शकांमुळे अनेक कलाकार घडण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आजपर्यंतच्या अनुभवावरुन मदनने नव्याने निर्माण होणार्‍या कलाकारांसाठी अनुभवाचा सल्लाही दिला आहे, आपण कोणत्याही प्रकारातील कला जोपासत असतांना अगोदर आपण आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करा. संसारात असा अथवा नसाल तरीही घरातील आईवडिल व इतरांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आपलीच असल्याने त्याची पूर्तता झाल्याशिवाय कलेचा विचार डोक्यात आणू नका. कला ही व्यसन असल्यासारखे वाटत असले तरी अशा प्रकारच्या अनेक कलाकारांचा जवळून अभ्यास करा डोळे उघडे ठेवून त्यांना लागलेल्या ठेचांच्या जखमा न्याहाळा मगच नाद करा. कला आणि व्यवहारज्ञानाची सांगड घातल्याशिवाय संसाराचा पाया भक्कम राहणार नाही. आज अनेक मदन अनेक गावोगावी आपली कला जोपासत आहेत परंतु त्यांनी
आपल्या कलेसाठी किती वेळ आणि स्वत:च्या उपजिवीकेसाठी, चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी किती वेळ द्यायचा याचा योग्य वेळी विचार करणेही तितकेच महत्वाचे आहे. बोटावर मोजण्याइतक्या काही मदनला शासनाची अल्पशी मदतही मिळते परंतु अनेक जण आज दहा पाच रुपयांना महाग झाले आहेत. नुसत्या टाळ्या आणि शिट्‌ट्यांनी पोट भरत नाही जगण्याचे योग्य साधन निर्मिती स्वत:ची जबाबदारीचे समीकरण महत्वाचे आहे. परिस्थिती सर्व काही शिकवित असली तरी वेळ निघून गेल्यावर त्या शिक्षणाचा तेवढा परिणाम होत नाही. कोणत्या समाजातील व्यक्ती कलेची जोपासना करतात त्यांची परिस्थिती काय असते व कोणत्या समाजातील व्यक्ती मनाप्रमाणे कलेचा आस्वाद घेतात यांचाही गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
Top