बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर)  भोगेश्वरी महादेव देवस्थान ट्रस्ट आणि भगवंत देवस्थान ट्रस्टमधील वाद न्यायप्रविष्ट असतांना कुळाने त्रयस्त व्यक्तीशी हातमिळवणी करुन काही जागेतील बदल सुरु केल्याने जागेसंबंधी वाद उफाळून आला आहे. सदरच्या जागेवरुन एकमेकांच्या राजकिय प्रतिस्पर्ध्यांकडूनही खेळ्या सुरु झाल्याने भोगेश्वरीच्या जागेचा वाद चव्हाट्यावर आला आहे.   
       बार्शीतील बारा ज्योतिर्लिंग मंदिरे, महादेवाची मंदिरे, भगवंताचे मंदिर, वीरशैवांची बारा मठे अशी धार्मिक ओळख आहे. शिव आणि विष्णु यांच्या महिमांमुळे बार्शीला धार्मिक वारसा व ऐतिहासिक महत्व लाभले आहे. येथील भोगेश्वरी या महादेवाच्या मंदिरातील धार्मिक विधी नियमितपर्ण पार पडण्यासाठी श्रध्दाळू भक्त गणू माळी यांनी मृत्यूपत्र करुन भोगेश्वरी देवाला जागा दान दिली होती. सदरच्या जागेला धर्मराज राऊत यांचे नाव कुळ म्हणून नोंद लागली. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या कुटूंबातील जोतीराम, रामलिंग, अंबऋषी धर्मराज राऊत व प्रभावती लक्ष्मण मठे यांची नावे वारस कुळ म्हणून लावण्यात आली. याशिवाय कसलाही संबंध नसतांना यशवंत बुडूख व त्यानंतर दत्तात्रय कश्यपी यांची चुकीची नावे लावण्यात आली. असंबंधीत व्यक्तीचे वहिवाटदार म्हणून लागलेले चुकीचे नाव काढून टाकण्यासाठी भोगेश्वरी महादेव ट्रस्टच्या समितीने पूर्वीपासूनच तक्रारी दिलेल्या आहेत. विविध प्रकारच्या दबावतंत्रामुळे भोगेश्वर ट्रस्टच्या तक्रारीवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर भोगेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने बार्शी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून अद्याप तो न्यायप्रविष्ट आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार भक्त व श्रध्दाळू यांनी भगवंतासाठी दान दिलेल्या भगवंत देवस्थानच्या मालकीच्या अनेक जागा असून सदरच्या अनेक जागा ट्रस्टमधील पंच व सरपंच यांच्या संगणमताने अनेकांनी लाटण्याचा प्रयत्न केला तर काहींनी लाटल्या असतांना भगवंत देवस्थानच्या वतीने त्या सोडविण्यासाठी कसलाही प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. तर ज्या जागेशी भगवंत देवस्थानाचा कसलाही संबंध नाही त्या ठिकाणी चुकीचे नाव लावून त्या ठिकाणी भांडत वेळ वाया घालवत असल्याचे दिसून येते.
     येथील श्री भगवंताच्या मूर्तीच्या डोक्यावर शंकर महादेवाची पिंड आहे. भगवंत मंदिराच्या शिखरावर मधोमध श्री शंकराची मूर्ती असून त्याचप्रमाणे येथील उत्तरेश्वर मंदिराच्या शिखरावर श्री भगवंताची मूर्ती पूर्वीपासूनच आहे. यावरुन शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथामध्ये संहिष्णुता होती व एकमेकांबद्दल आदर व प्रेम होता. दोन्ही समाज गुण्यागोविंद्याने नांदत होता हे दिसून येते. तर सद्यस्थितीत भगवंत देवस्थानच्या ट्रस्टींकडून दोन समाजाच्या भावना दुखावण्याचे काम जाणीवपूर्वक वेळोवेळी होत असल्याचे काही घटनांतून दिसून येते. भगवंत मंदिरातील तीर्थस्थळ विहीरीमध्ये महादेवांच्या पिंडी आहेत. या विहीरीचे छत बंद करुन दरवाजाला कुलूप लावून मागील काही दिवसांपासून दर्शन बंद करण्यात आले आहे. सदरच्या ठिकाणी महादेवाच्या मूर्तीजवळ दिवा लावणेही बंद करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी हरिहर भेट उत्सवात रात्री बारा वाजता उत्तरेश्वर मंदिर येथे विष्णुला प्रिय असलेल्या तुळशीची पाने व मंजुळा या महादेवाला अर्पण केल्या जातात व त्यानंतर महादेवाला प्रिय असलेल्या बिल्वाचे पान भगवंत मंदिरात येऊन भगवंताला अर्पण करतात. यासाठी अनेक दूरहून भक्त येतात यावर्षी तर खुद्द जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांच्या मातोश्रींनीही हजेरी लावली व उत्सव पाहिला. परंतु यावर्षी भगवंत मंदिरातील ट्रस्टी व पुजार्‍यांनी यावेळी भगवंत मंदिरात कुलूप लावून निघून गेल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांना मंदिराबाहेरुनच दर्शन घेऊन जावे लागले. वेळोवेळी होणारे धार्मिक विधी व परंपरा मोडीत काढून इतिहास लपविण्याचा व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याचे दिसून येत आहे. भोगेश्वर देवस्थानला दानातून मिळालेल्या जागेच्या बाबतही भगवंत देवस्थान ट्रस्टच्या वतीने माझेही माझेच अन दुसर्‍याचेही माझेच या भावनेतून केलेला खटाटोप या तक्रारींवरुन चव्हाट्यावर आला आहे.
 
Top