बार्शी -  शासनाने सर्वसामान्य कुटूंबातील नागरिकांच्या आरोग्यासाठी देशभर ग्रामीण रुग्णालयांचे जाळे निर्माण केले आहे. शासनाने प्रत्येक ठिकाणी मुबलक प्रमाणात वैद्यकिय अधिकारी, सहाय्यक व इतर सर्वतोपरी यंत्रसामुग्रीने सज्ज केली आहे. बार्शीतील वैद्यकिय अधिकारी मात्र मनमानी कारभार करुन शासनाचे जावई असल्यासारखे वागतांना व रुग्णांची पिळवणूक करतांना दिसून येत असल्याची बाब नागरिकांच्या तक्रारीमुळे समोर आली आहे.
    शरद क्रीडा व सांसक्कृतिक प्रतिष्ठान एनजीओ शहराध्यक्ष शिरीष ताटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैद्यकिय अधिक्षीका डॉ.शितल बोपलकर यांचेकडून उपचार होतांना रुग्णांना त्यांच्या पतीच्या सोनोग्राफी केंद्रातूनच तपासणी करण्याचा आग्रह केला जातो. त्यांच्या संपर्क क्रमांकाच्या चिट्‌ट्यादेल ग्रामीण रुग्णालयात त्यांच्याकडे नेहमीच दिसून येतात. याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रावखंडे यांनाही वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. सदरच्या ग्रामीण रुग्णालयात शासनाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रीत झालेल्या अनागोंदी कारभाराची दळल घेण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
    ग्रामीण भागातील अनेक नागरिक सकाळी लवकर रांगा लावल्याचे चित्र दिसून येते परंतु येथील बाह्य रुग्ण विभाग कधीही वेळेत सुरु केला जात नाही. आपत्कालीन परिस्थितीतील रुग्ण व प्रसुतीसाठी आलेल्या महिलांनाही अनेक वेळा जागेवर ताटकळत बसण्याची वेळ येते. अनेकांना खाजगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागतो काही जणांना वेळेत उपचार न झाल्याने गर्भवती महिलांचा मृत्यू तर काहींना आपले अपत्य गमवावे लागले आहे. सदरच्या गंभीर बाबीची दखल वेळीच घ्यावी अन्यथा यापुढे आंदोलन केले जाईल असा इशारा शिरीष ताटे यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
 
Top