उस्मानाबाद - अल्पसंख्यांक समाजातील कल्याणसाठी  केंद्र व राज्य सरकामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हेच उदिष्ट असून आर्थीक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी अल्पसंख्यांक समाजातील  व्यक्तींचा आणि शिक्षण क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी शासकीय योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
अल्पसंख्याक हक्क दिनाच्या अनुषंगाने येथील शम्सीया हॉल मध्ये जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती आणि अमन कल्याण सेवाभावी संस्था यांच्या विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अभिषेक त्रिमुखे, डॉ.अब्दूल शाबान, इरफान इंजिनीअर, डॉ. जर्रा काझी, नगरपालिकेचे अध्यक्ष सुनिल काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळकृण भांगे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शिल्पा करमरकर, न.प.मुख्याधिकारी शशीमोहन नंदा, उपनगराध्यक्षा खलीपा कुरेशी, मसूद शेख, समीयोद्यीन मसायक, अमोल पाटोदेकर, अन्वर शेख यांची उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्राप्त झालेल्या संगणकाच्या उपयोग करुन शिक्षणात उत्तुंग भरारी घ्यावी. अल्पसंख्यांकाच्या उन्नतीसाठी शिक्षण हा महत्वाचा घटक असून नवनवीन माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. समान व्यवसाय करणाऱ्या सर्व  घटकांनी एकत्र येऊन कंपनी /संघ स्थापन करावा. या उद्योगासाठी लागणारे सर्वातोपरी सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल. पंतप्रधान मंत्री कार्यालयाकडून अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी 15 सुत्री कार्यक्रम  राबविण्यात येत असून त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाचा विकास,आधुनिकीकरण,स्वयंरोजगार,दलित सुधार, सेवाभरतीमध्ये आरक्षण, तंत्रज्ञान विषयक शिक्षा, ग्रामीण आवास आरक्षण, सांपदायिक घटना संरक्षण व दंगलग्रस्त पीडितांना विशेष सहाय्य मिळवून देण्याचे कार्य केले जाते. आपल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सवोतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले. 
 त्रिमुखे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजातील घटकांनी आपल्या उर्दू भाषेचा विकास शिक्षणांच्या माध्यमातून  करावा. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादन करावे. सर्व समाजातील व्यक्तींशी संबंध वाढविण्यासाठी समन्वय ठेवावा. वाईट घटनांपासून अलिप्त राहावे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही घटनांशी सामना करावा लागणार नाही, अशी मानसिकता निर्माण करुन जातीभेदांचा अंगीकार न करता  सर्वांशी सामजस्य व सलोख्याचे संबंध प्रस्तावित करावेत. पोलीस प्रशासन आपल्या अडअडचणीवर प्राधान्याने सोडविण्यात येतील,असे त्यांनी सांगितले.  
प्रारंभी  जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी नगर परिषद शाळा क्र. 8, उस्मानाबाद येथे संगणक कक्षाचे उदघाटन केले. यावेळी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, नगर परिषदेचे अध्यक्ष सुनिल काकडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा, प्रशासन अधिकारी रविंद्र लोमटे, नईम सर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.नारनवरे यांच्या उपस्थिती मुलांनी शैक्षणिक पाठय पुस्तक असलेली सी.डी. दाखविण्यात आली.
चर्चासत्राचे प्रास्तावकि महसूद शेख यांनी केले. श्री. खालीलसर यांनी अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त सर्व उपस्थितांना शपथ दिली. मौलाना इरशाद यांनी अल्पसंख्याक हक्क दिनी नाताचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कादर खान पठाण यांनी केले.   
 
Top