उस्मानाबाद -  ‘आत्मा’ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांचे फेडरेशन स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज दिल्या.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.नारनवरे यांनी ‘ आत्मा ’  अंतर्गत विविध यंत्रणांची बैठक घेऊन एकात्मिक कृषी विकासासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.उबाळे, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही.डी.लोखंडे, नाबार्डचे जिल्हा समन्वयक सी.डी. देशपांडे, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मत्स्य विकास, पशुसंवर्धन, रेशीम विकास यंत्रणांचे प्रमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.
    शेतकरी गटांचे फेडरेशन स्थापन केले तर बँकामार्फत संबंधित शेतकरी गटांसाठी बॅक कर्ज उपलब्ध करुन देणेही सोपे होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी गटांची बैठक घेऊन त्यांना या फेडरेशन स्थापन करण्यासंदर्भातील माहिती दयावी आणि जिल्ह्यातील संपूर्ण गट या प्रक्रियेत सहभागी होतील हे पाहण्याच्या सूचना त्यांनी प्रकल्प संचालकांना दिल्या.
    प्रयोगशील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन दयावे, स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांची क्षमता बांधणी करावी, चांगले काम करणाऱ्या शेतकरी गटांना उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीसपर पारितोषिकांची योजना राबवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिल्या. अधिकाधिक ऊस शेती ही ठिबक सिंचनवर झाली पाहिजे. टंचाई परिस्थिती असताना ऊसासारख्या पीकांना ठिबक द्वारेच पाणी दिले पाहिजे. शेतकरी गटांमार्फत ही आवश्यकता शेतकऱ्यांना पटवून दया, असे निर्देश त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले.
    जिल्हास्तरीय सल्ला समितीतील अशासकीय सदस्यांना शेतकरी गटाच्या फेडरेशनवर मानद सदस्य म्हणून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 
Top