बार्शी -  गरीब व गरजू रुग्णांची गैरसोय होत असल्याने सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत पाटील व दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे यांनी बार्शी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. दहा दिवसांत त्रुटींची पुर्तता करुन योजना पूर्ववत करण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
    तांत्रीक त्रुटींचे कारण सांगून मागील दोन महिन्यांपासून बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालयातील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना बंद करण्यात आली होती. गरीब व गरजू रुग्णांची गरज लक्षात घेऊन विविध संघटनांच्या वतीने तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्रुटींच्या पुर्ततेसाठी रुग्णालयाच्या प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे रुग्णांचे हाल सुरु झाले व लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू लागल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगीतले.
    तहसिलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसिलदार उत्तम पवार यांनी सदरच्या प्रश्‍नावर तात्काळ उपाययोजना करत जगदाळे मामा रुग्णालयाचे योजनेचे प्रशासकिय व्यवस्थापक बोराडे यांना बोलावून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. योजनेचे जिल्हा समन्वयक श्री सोनवणे यांचेशी फोनवर चर्चा करुन त्रुटींबाबत चर्चा केली. त्यावर बोराडे यांनी काही त्रुटींची पुर्तता केल्याचे व उर्वरीत ताबडतोब पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
 
Top