बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) वर्षानुवर्षे जिजीया करासारखे शेतकर्‍यांच्या कररुपातून आडत वसूल केली जाते, आडत हा इजीमनी आहे, शेतकर्‍यांची गरज व वस्तुस्थिती पाहून महाराष्ट्र आडत करातून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. प्रस्थापितांना वाईट वाटले तरी शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यावरील ओझे कमी करण्यासाठी लवकरच हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांनी केले.
    पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिल्या खाजगी लक्ष्मी सोपान कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उद्घाटन प्रसंगीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक जी.व्ही.रमणा, साखर संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल, भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन तानाजी सावंत, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, जि.प.सदस्य संजय पाटील, चंद्रकांत बारगजे, केशव घोगरे, विश्वास शिंदे, अनिल डिसले, रावसाहेब मनगिरे, डॉ.बी.वाय.यादव, प्रा.मधुकर फरताडे, देवा खटोड, अभियंता बारवकर, नाना कसपटे, काका गायकवाड, बाबासाहेब कापसे, श्री.निला, श्री.जगदाळे, रणवीर राऊत, विजय (नाना) राऊत आदी उपस्थित होते.
   
    सुभाष माने म्हणाले, आडत व्यापार्‍यांनी यापुढे खरेदीदार व्हावे, ते खरेदीदार झाले तर वाढलेल्या दरामुळे शेतकर्‍यांना आणखी फायदा होईल. शेतकर्‍यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळणे गरजेचे आहे परंतु त्याची अंमलबजावणी होतांना दिसन नाही. शेतीमालाच्या दराची आधारभूत किंमत ठरविण्याची पध्दती ही संशोधनाचा विषय झाली आहे. लातूर येथील टिना ऑईल मिल यांच्याकडून सोयाबिनच्या खरेदीत शेतकर्‍यांची दरातील व उतार्‍यातील फसवणूक बंद करण्यासाठी आपण त्यांना आदेश दिले आहेत. शेतकर्‍यांची विविध प्रकारे होत असलेली फसवणूक थांबण्यासाठी शेतकर्‍यांनीही जागृत होण्याची व अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. नियम व आवश्यकतेप्रमाणे सर्व दोन कागदपत्रांची पुर्तता केल्यामुळे दोन तासात कृषि उत्पन्न बाजार समितीचा परवाना दिला, आज प्रत्यक्ष बाजार समितीचे वैभव पाहून परवाना दिल्याचे सार्थक झाले व आनंद मावला नाही. आज कोणतीही गोष्ट पैशाशिवाय होत नाही , पैशाचे सोंग आणता येत नाही. या खाजगी बाजार समितीने इतिहास निर्माण केला आहे. शेतकर्‍यांचा हा उत्साह व उत्सव नवीन पर्वाची सुरुवात आहे. परिसरात प्रत्यक्ष फिरुन पाहिल्यानंतर अपेक्षेपेक्षा पाचपटीने चांगले काम झाले आहे. या ठिकाणचे काम पाहून अधिक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे यामुळे शेतकर्‍यांना कोणावाचून विसंबून राहण्याची गरज लागणार नाही व यापुढे प्रत्येकाला स्पर्धेत उतरावे लागेल. सावळाराम शिंदेसारख्या आडत व्यापार्‍यांचे कौतुक वाटते. महाराष्ट्रात १९६३ साली कायदा केल्यापासून परिस्थिती सुधारणा होत आहेत परंतु आजही शेतकर्‍यांच्या मालाचा योग्य मोबदला व हातात किंमतीचा परतावा वेळेत मिळत नाही अशी अवस्था झाली होती, त्यावर खाजगी बाजार समितीचा चांगला पर्याय पुढे आला व तो सत्यातही उतरत आहे. देशात पूर्वीपासूनच शेतकर्‍यांच्या हितासाठी बाजारसमित्यांची स्थापना करण्यात आली परंतु शेतकर्‍यांचे हित हा उद्देशच दिसेना झाला आहे. बाजारसमित्यांतील प्रस्थापित काय करतात ते जवळून पाहिले आहे, संचालक त्यांच्या नात्यागोत्यातील व्यक्तींना कामावर लावण्यात दंग आहेत व ते इमानदारीने काम करत नसल्याचे दिसून येते. बाजारसमित्यांची वाहने इतरच फिरविली जातात. कोणी तिरुपतीला तर कोणी इतर नको त्या ठिकाणी दिसून येतात. मुंबईतील असे प्रकारही समोर आले होते अभ्यासदौर्‍यांच्या व आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठेच्या नावाखाली भलत्याच दौर्‍यांना गेले. राजाभाऊ राऊत यांच्यासारखा सक्षम नेता शेतकर्‍यांचा कैवारी म्हणून मैदानात आल्याने त्यांच्या मागे उभे रहाण्याचे आम्ही ठरविले आज त्याचा आनंद होत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तुकाराम, ज्ञानेश्वर आदी संत व त्यांचे विचार ज्यांना कळत नाहीत त्यांना या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी म्हटले.
    यावेळी राजेंद्र राऊत यांनी प्रास्ताविक, किशोर तोष्णीवाल, श्री बारगजे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लक्ष्मी प्रतिमा पूजन, दिपप्रज्वल करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोर मांजरे यांनी केले तर आभार केशव घोगरे यांनी मानले.
 
Top