बार्शी - जागतिक एडस् दिनाच्यानिमित्ताने रक्तदान क्षेत्रात राज्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल बार्शीतील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने मुंबईत गौरव करण्यात आला असल्याची माहिती अजित कुंकूलोळ यांनी दिली.
बार्शीतील इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी, औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढी व के.ई.एम. हॉस्पिटल रक्तपेढी, पुणे या तीन रक्तपेढ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
१ डिसेंबर जागतिक एडस् दिनी राज्यातील रक्तदान चळवळीतील संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, युनिसेफचे सल्लागार तौफिक बक्काली, कुटुंब कल्याण आयुक्त श्रीमती ए.एच. कुंदन, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, एडस् नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक खुशालसिंह परदेशी, सहा. संचालक डॉ. मोहन जाधव व सह. संचालक (ऐच्छिक रक्तदान) दत्ताप्रसाद शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बार्शीतील रामभाई शहा रक्तपेढीचा सलग दुसर्‍या वर्षी उत्कृष्ट कामकाजाबद्दल स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी रक्तपेढीच्यावतीने अध्यक्ष डॉ. विक्रम निमकर, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, सचिव सुभाष जवळेकर, रक्तपेढीचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राम जगताप यांनी हा गौरव पुरस्कार स्वीकारला. राज्यातील तालुकास्तरावर प्रथमच १००% नॅट टेस्ट, ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०टक्‍के दरात रक्त पुरवठा, अत्याधुनिक चाचण्या, १००टक्‍के रक्त विघटन, ऐच्छिक रक्तदान चळवळ रुजवणे आदी कामांबद्दल आरोग्य विभागामार्फत सदरचा गौरव करण्यात आला.
 
Top