उस्मानाबाद -   शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून पुढील काळात शेतकऱ्यांनी प्रडयुसर कंपनीशी संलग्न होऊन जिल्ह्यात हरित क्रांती घडवून आणण्यासाठी प्रगतीशील शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
        येथील मध्यवर्ती  प्रशासकीय इमारतीच्या डी.पी.डी.सी.सभागृह आयोजित आत्मातंर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीचे सदस्य यांची शेतकरी गट निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपनी/संघ स्थापन करणेबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उदघाटनप्रसंगी  त्यांनी वरील आवाहन केले.
    या कार्यशाळेस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही.डी.लोखंडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सी.डी. देशपांडे, व्हीआरडी ॲग्रो प्रडयुसर कंपनी, सारोळयाचे अॅड. अमोल रणदिवे, चाटर्ड अकाऊटंट रामेश्वर मुंढे, बी.टी.बरुरे, उप विभागीय कृषी अधिकारी यु.बी. बिराजदार, प्रकल्प उपंसचालक व्ही.एम.हिरेमठ, श्री. शहा, आत्माचे प्रकल्प उपसंचालक एस.आर.चोले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
    डॉ.नारनवरे म्हणाले की, जिल्ह्यात शेतक-यांनी अल्प कालावधीत 15 हजार 256 शेतकरी गटापैकी 14 हजार 175 गट स्थापन करुन महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांमार्फत सोडविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावा. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी  कृषीतंर्गत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न वाढवावे, जेणेकरुन आपली आर्थीक  स्थिती सुधारण्यास मदत होईल. गटशेतीच्या आधारे शितगृहाची स्थापना करावी. शासनाने गटामार्फत कृषीच्या योजना राबविण्याचे कृषी धोरण ठरविले आहे. जिल्ह्यात 8 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्या आहेत. शेतक-यांनी आपल्या उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी जास्तीत जास्त प्रडयुसर कंपन्यांची निर्मिती करुन कृषीतंत्राच्या आधारे पाण्याचे नियोजन, पॉली हाऊस, उस्मानाबाद शेळीचे मांस निर्यात प्रकल्प, दुग्ध व्यवसाय, बियाणे, जनावरांसाठी  मुर्गास चारा उत्पादन करावा. केंद्र व राज्य सरकारमार्फत कृषी विषयक योजनांचा लाभ घ्यावा, असेही  त्यांनी सांगितले.
    शेतक-यांच्या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी मात करण्यासाठी निशुल्क मार्गदर्शकांना बोलावून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. शेतकऱ्यांची प्रगती झाल्यास आत्महत्याप्रकार थांबतील. शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी  व येणा अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे  डॉ.नारनवरे यांनी सांगितले.
    अॅड. रणदिवे म्हणाले की, गट आणि कंपनी स्थापन करणे शेतक-यांच्या उत्पादनात चालना देणारी आहे. पेरणी करतांना शेतकऱ्यांनी कंपनीचे नाव न पाहता बियाणे कोणत्या जातीचे आहे,हे पहाण्यासाठी सवय लावून घेतली तरच त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. शेतक-यांना विविध पीकांवर कंपनीच्या माध्यमातून बियाणे विकसीत करणे आवश्यक आहे, याच बरोबर करार पध्दतीने शेती केली तर कंपनीच बियाणांचा पुरवठा करते. शेतीतील मंजूरांची संख्या पाहता शेतीविषयक कामे रास्त दरात कंपन्यामार्फत केली जातात त्यामुळे त्यांची बचत होते. पारंपारीक शेती न करता अत्याधुनिक तंत्राच्या आधारे शेती करावी. शेतक-यांची इच्छाशक्ती असेल तर शेतकरी  आपल्या शेतात लघुउद्योग करु शकतो. त्यामुळे त्यांचा आर्थीकस्तर उंचावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
    श्री.मुंडे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शेतकऱ्यांनी प्रडयुसर कंपनी स्थापन करतांना त्यांना लागणाऱ्या सात टप्यातील कागदपत्रांची माहिती करुन घ्यावी. आत्मा मार्फत मार्गदर्शन घेऊन प्रस्तावात येणाऱ्या अडचणीचे सोडवाव्यात, असे सांगितले. देशंपाडे यांनी नाबार्डकडून शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबविण्यात येतात, त्यासाठी शेतकऱ्यांनी कंपनी स्थापन गरज आहे. नाबार्ड मार्फत थेट कर्ज योजनेतून शेतक-यांना कर्जपुरवठा केला जातो. कंपनी स्थापनेसाठी मागणी प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी आवाहन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री.लोखंडे यांनी केले तर आभार श्री.हिरेमठ यांनी मानले.
    या कार्यशाळेस जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीचे सदस्य, प्रगतीशील शेतकरी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 
Top