उस्मानाबाद -  जिल्ह्यात हत्तीरोग नियंत्रणासाठी  14 ते 18 डिसेंबर या कालावधीत एकदिवशीय सामुदायीक औषधोपचार मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना डी. ई. सी. आणि अल्बेडाझोल गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या घरी येणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या गोळ्या त्यांच्यासमक्ष खाऊन या मोहिमेत सहभाग नोंदवावा आणि हत्तीरोग निर्मूलनासाठी साह्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासंदर्भातील नियोजनासंदर्भात जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी श्री. पाटील यांनी हे आवाहन केले.
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात दि. 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत तर शहरी भागात 14 ते 18 डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात 541 पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  2 हजार 122 आरोग्य कर्मचा-यांमार्फत घरोघरी जाऊन या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.  हत्तीरोग दुरीकरणासाठी ही मोहीम महत्वाची असून नागरिकांनी आरोग्य कर्मचा-यांसमक्ष या गोळ्या खाव्यात. उपाशीपोटी या गोळ्या खाऊ नयेत असे आवाहनही करण्यात आले आहे. त्याचबरोबर गरोदर महिला, गंभीर आजारी रुग्ण यांनी या गोळ्यांचे सेवन करु नये, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. के. डी. लोमटे यांनी केले आहे.
 
Top