बार्शी - जिल्ह्यातील अनेक व्यापारी व नागरिकांना वाहन खरेदीबाबात सुमारे ३५ ते ४० लाखांची फसवणूक करुन राजलक्ष्मी मोटर्स या चारचाकी वाहन खरेदी विक्रीदार दिपेश उर्फ पप्पू मोहनलाल परमार फरार झाला आहे. या व्यवसायात भागीदार असलेल्या राजलक्ष्मी एकसंबेकर (रा.चिंचवड,पुणे) हिनेही दिपेश परमार विरोधात ४० लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद बार्शी पोलिसांत नोंदविल्याने अनेकजण चक्रावले आहेत. सदरच्या प्रकारानंतर बार्शीतील मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या सावकारीवर चर्चा रंगली आहे.   
     दिपेश परमार याने सर्व कंपन्यांच्या कार कमर्शियल वाहनांची फायनान्स इन्शुरन्स, आरटीओ पासिंग व डिलीव्हरी एकाच छताखाली अशी जाहीरात करुन अनेकांना टाटा इंडिका, व्हीस्टा, पिकअप, स्कूलबस, बोलेरो आदी प्रकारची चारचाकी वाहने विकली. वाहन खरेदी, वाहनांची विमा, वाहनांचे पासिंग तसेच संबंधीत फायनान्स कंपनीेच्य देय रकमा ग्राहकांनी दिल्यानंतर दिपेश परमार याने सदरची रक्कम इतरात्र वापरली. यचमध्ये बेळे, नायकोजी, नांदेडकर, बोधले, पाटील, देशमुख, रजपूत, भिंगार्डे, कांबळे, शिंदे अशा अनेक व्यक्तींची फसवणूक झाल्याच्या तक्रारी येत असतांना दिपेशची भागीदार राजलक्ष्मी एकसंबेकर हिने वेगवेगळ्या थापा मारुन तक्रारदारांना परतवून लावले. काही जणांना बनावट वाहन क्रमांक दिले होते, काही जणांना वाहनाच्या विम्याच्या पावत्याच बनावट होत्या, काही जणांना आरटीओचा केवळ क्रमांक लॉकचा क्रमांक देण्यात आला. काही जणांच्या जुन्या वाहन विक्रीच्या आरसीटीसी बुकवर स्वाक्षर्‍या घेऊन परस्पर वाहन विक्री करुन रक्कम हडपली. नांदेड, सातारा आदी अनेक ठिकाणच्या चारचाकी शोरुममधून वाहने विक्रीला आणून अनेकांना दिली आहेत. सदरच्या वाहनाच्या रकमा संबंधीत शोरुमकडे जमा झाल्या की नाही हे तपासानंतर लक्षात येईल. त्यानंतर आणखी किती लाखांची फसवणूक झाली याचे आकडे समोर येतील. अशा प्रकारच्या फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत गेले, फसवणूकीच्या प्रकाराची मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब झाल्यानंतर काही जणांनी पोलिसांत तक्रारी अर्ज दिले. सदरच्या प्रकारानंतर भागीदार एकसंबेकर हिने काही जणांना एकत्र बोलावून घेतले व हातापाया पडून फसवणूकीतील रक्कम परत देण्यासाठी एक महिन्यांची मुदत मागीतली. काही दिवसांची मुदत मिळाल्याने पूर्व तयारी करुन आडवा रस्ता येथील सर्व दफ्तर गुंडाळून दिपेश परमार व तिची भागीदार एकसंबेकर हे दोघेही फरार झाले. काही जणांनी विधीज्ञांकडून रितसर नोटीसा बजावल्या तर काही जणांनी एकसंबेकर हिचा पत्ता शोधून तिचे घर गाठले. आजपर्यंत दिपेश परमारने मोबाईलचे अनेक क्रमांक बदलले आहेत. सदरच्या अनेक लोकांना गंडा घालून जमा केलेली रक्कम मोठ्या शहरात स्थिरस्थावर होण्यासाठी गुंतवण्यात आली आहे तसेच बार्शीत महिन्याला १० टक्के, २० टक्के, ३० टक्के अशा प्रकारच्या खाजगी सावकार्‍या सुरु असून काही सावकारांचे पैसे दिपेश देणे लागत होता अशी चर्चाही ठिकठिकाणी रंगत आहे. सदरच्या संशयिताची आणखी काही माहिती मिळाल्यास तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल बोस यांचेशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदरच्या संशयितास अटक करुन अधिक माहिती घेतल्यास नेमकी किती जणांची व किती रुपयांची फसवणूक झाली अथवा नाही हे समोर येणार आहे.
 
Top