उस्मानाबाद- जमिनीचे पोट फाडून देव प्रकट होणार आहे. हजारो वर्षांपूर्वीची विठ्ठल बिरुदेवाची मूर्ती जमिनीतून बाहेर येणार आहे. त्यासाठी भाविकांनी मलकापूर, रत्नापूर गायरानमध्ये भूमितून बाहेर आलेल्या मूर्तीची पूजा करण्यासाठी व महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी बतावणी करणारा आणि जमिनीतून मूर्ती बाहेर आल्याचा भास निर्माण करणारा भोंदू नागनाथ गीना घोडके प्रशासनाला याची खबर लागताच फरार झाला आहे. हा प्रकार परंडा तालुक्यातील रत्नापूर, मलकापूर शिवारात १२ डिसेंबर रोजी उघडकीस आला
            रत्नापूर, मलकापूर येथील जावई असलेला नागनाथ घोडके याला मागील २५ वर्षांपासून जमिनीतून देवाची मूर्ती बाहेर येणार असल्याचा भास होत होता. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील रहिवाशी असलेल्या घोडकेने भोळ्याभाबड्या ग्रामस्थांना आपल्या प्रभावाखाली घेऊन जमिनीखालून हजारो वर्षांपूर्वीची विठ्ठल बिरुदेवाची मूर्ती निघणार असल्याची चक्क जाहिरात पत्रकाद्वारे केली. विशेष म्हणजे या पत्रकावर गावातील नागनाथ वाघमोडे, दिनेश राऊत, खिलुदेव कोळेकर, गिरमल चोरमले, महादेव वाघमोडे आणि मारुती हाके यांचीही नावे आहेत. नागनाथ घोडके याच्या हस्ते भूमीतून मूर्ती बाहेर काढण्याचा चमत्कार होणार आहे. याला भाविक-भक्तांनी येण्याची कृपा करावी, असेही या पत्रकात म्हटले आहे. ११ डिसेंबर रोजी दुपारी ३.३६ वाजण्याच्या मुहूर्तावर भूमीतून मूर्ती बाहेर काढण्याचा आणि शनिवारी दुपारी ३ वाजून ४३ मिनीटांनी मूर्ती प्रतिष्ठापणा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे या पत्रकावर नोंदविण्यात आले आहे. रत्नापूर, मलकापूर शिवारात राज्य सरकारने ३० एकर जमिनीवर वनीकरण करण्यासाठी वृक्ष लागवड केली आहे. याच जमिनीतून ही मूर्ती बाहेर येणार असल्याची जाहिरातबाजी भोंदू घोडके याने पत्रकबाजी करत केली होती. शुक्रवारी तो हा चमत्कार करणार होता. त्यापूर्वी कोणीही या जागेकडे फिरकू नये, असा दम त्याने ग्रामस्थांना भरला आणि गुरुवारी मध्यरात्री स्वत: जावून जमिनीत खड्डा खणून त्यावर दगड, काही अक्षरे लिहिलेल्या तांब्याच्या पट्‌ट्या आणि हळद टाकून दिली आणि जमिनीतून हजारो वर्षांपूर्वीची विठ्ठल बिरुदेवाची मूर्ती बाहेर आली असल्याचा बनाव निर्माण केला. हा सर्व प्रकार भोंदूगिरी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी रत्नापूर, मलकापूर शिवारातील हजारो भाविकांनी या बिरुदेवाच्या मूर्तीला शेकडो रूपयांचा नैवेंद्य अर्पण केला आहे. देवाच्या नावाखाली भोळ्या भाबड्या भाविकांकडून शेकडो रूपयांची देणगी उकळून त्यांना नागविले गेले आहे. यात गावातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक देखील सहभागी आहेत. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सरकारची गायरान जमीन बळकाविण्यासाठी जमिनीतून हजारो वर्षांपूर्वीची विठ्ठल बिरुदेवाची मूर्ती जमिनीतून वर येणार असल्याचा दावा करणारा भोंदू नागनाथ घोडके लागताच पळून गेला आहे. मागील तीन दिवसांपासून परंडा तालुक्यातील रत्नापूर शिवारात हजारो वर्षे जुनी जमिनीतील मूर्ती वर येणार आहे. त्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करणारी पत्रकबाजी या भोंदूने केली होती. आता प्रशासन नेमकी काय कारवाई करणार, याकडे नागविल्या गेलेल्या भाविकांचे लक्ष लागले आहे. पंचनाम्याचे आदेश दिले आहेत : जिल्हाधिकारी
असा प्रकार परंडा तालुक्यातील रत्नापूर, मलकापूर शिवारात घडला असल्याची माहिती मिळताच तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. अवैज्ञानिक गोष्टींचा आधार घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दैवी शक्तीचा भास निर्माण करून लुबाडणे चुकीचे आहे. तसे झाले असेल तर याप्रकरणी जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाईल. नागरिकांनी अशा भोंदूंवर विश्‍वास न ठेवता माणसात आणि आपल्यात, आपल्या कामात देव शोधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. प्रशासन योग्य कारवाई करेल : एम. डी. देशमुख

 
Top