उस्मानाबाद - जिल्ह्यातील गेल्या काही दिवसात शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. या घटना दुर्दैवी असून शेतक-यांनी अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन नेहमीच सकारात्मक असून आता शेतक-यांच्या कोणत्याही अडचणींची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. याशिवाय, सर्व उपविभागीय अधिकारी हे गावांत जाऊन शेतक-यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
    गेल्या काही दिवसांत शेतक-यांनी अशा प्रकारचे जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या. अशाप्रकारचे टोकाचे पाऊल शेतक-यांनी उचलू नये. अधिक सकारात्मक पद्धतीने आलेल्या संकटांना सामोरे जावे. प्रशासन नेहमीच त्यांच्या सोबत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी नमूद केले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 02472-225618 या संपर्क दूरध्वनी शेतक-यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी आणि अवल कारकून त्याठिकाणी संबंधितांच्या अडचणी जाणून घेऊन संबंधित विभागांशी पाठपुरावा करणार आहे.
    आजपासूनच सर्व उपविभागीय अधिका-यांना ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, कृषी सेवक, कृषी सहायक यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेतक-यांशी निगडीत विविध शासन यंत्रणांनीही अधिक सकारात्मक पद्धतीने शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात. शक्य असेल तर तात्काळ त्या अडचणी मार्गी लावाव्यात, असेही त्यांनी बजावले आहे. याशिवाय, संबंधीत तालुक्यांच्या तहसीलदारांनी त्यांच्याकडे येणाऱ्या शेतक-यांच्या प्रश्‍नावर तात्काळ निर्णय घ्यावा. निर्णयाची बाजू त्यांना समजावून सांगावी, असे सांगण्यात आले आहे.
    प्रशासन अधिक सकारात्मक पद्धतीने शेतक-यांच्या प्रश्‍नी विचार करीत आहे. त्यामुळे अशा प्रकारे मौल्यवान जीवन संपवण्याचा विचार कोणी करु नये, असे आवाहनही डॉ. नारनवरे यांनी केले आहे. 
 
Top