बीड -  उसतोड कामगारांच्या उन्नतीसाठी सातत्याने लढा देणाऱ्या स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने उसतोड कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे सांगून या मंडळाचे मुख्यालय परळी वैजनाथ येथे राहील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या गोपीनाथगड या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या समारंभास ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री सानप, राष्ट्रसंत भय्यूजी महाराज, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार प्रितम मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, विनायक मेटे, महादेव जानकर, यशश्री मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
असामान्य व्यक्तीमत्वातून स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी आभाळाएवढी उंची गाठली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विधानसभेतील कामकाज शिकलो अशा शब्दात स्व. मुंडे यांच्या स्मृती जागृत करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. मुंडे यांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक पैलूंना यावेळी आपल्या भाषणात स्पर्श केला. स्व. मुंडे यांनी आपल्या कारकीर्दीत सातत्याने गोरगरीब, शेतकरी, बहुजन आणि उसतोड कामगारांच्या प्रश्नांविषयी आस्था बाळगली. सातत्याने ते यांच्यासाठी लढत राहीले. त्यांच्या स्वप्नातील अनेक निर्णय आमचे सरकार घेणार असून त्यांच्या स्वप्नातील उसतोड कामगारांच्या प्रगती विषयी आम्ही सदैव जागरुक राहणार आहोत. राज्यातील 7 लाख असंघटीत क्षेत्रातील उसतोड कामगारांना संघटीत क्षेत्रात आणून त्यांना विविध सोई-सुविधा, सवलती देण्यासाठी मंडळ काम करणार आहे. कामगारांच्या उन्नतीसाठी शासन मंडळाच्या माध्यमातून सदैव कटिबध्द राहिल असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. मुंडे यांची श्रध्दा असलेल्या भगवान गडाच्या सर्वांगिण विकासाकरीता राज्य शासन निधी उपलब्ध करुन देईल व स्व. मुंडे यांच्या संकल्पनेतील विकास आराखडा त्याठिकाणी राबविण्यात येईल असे सांगितले.
स्व. मुंडे यांच्या स्मारकाच्या उभारणीबद्‌दल कौतूक करुन मुख्यमंत्र्यांनी हे स्मारक सर्वांना प्रेरणादायी ठरेल असे सांगितले. हे स्मारक म्हणजे गोपीनाथगड या नावाने एक प्रेरणास्थान होणार असल्याचे  मुख्यमंत्री म्हणाले. परळी तालुक्यात राष्ट्रसंत भय्युजी महाराजांनी सुरु केलेल्या विविध उपक्रमांबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.
प्रारंभी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी स्व. गोपीनाथराव  मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी  स्व. मुंडे यांच्या विषयी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात आपल्या भावना व्यक्त केल्या.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रत्येकाच्या विचार-आचार आणि संस्कारातून स्व. मुंडे स्मृतीरुपाने जागृत राहणार असून त्यांनी दिलेल्या लढयाची व तळमळीची जाणीव ठेवून आपणा सर्वांना पुढचा प्रवास करावयाचा आहे. त्यांच्या स्वप्नातील विकासाच्या संकल्पना आपले सरकार राबविणार आहे. तरुणपिढीला त्यांनी सदैव प्रोत्साहित केले. तरुण पिढीला तंत्रकुशल बनविण्याचे त्यांचे स्वप्न या गोपीनाथगडाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. हा गड स्मारकच नव्हे तर व्यक्तीमत्व घडविणारा गड म्हणून ओळखला जाणार आहे. स्व.मुंडे हे एक व्यक्ती नव्हते तर ते एक संस्था होते. त्यांची विधानसभेतील कारकीर्द आणि त्यांच्या भाषणाची आठवण कायम राहणार आहे. राजकारणामध्ये कधीही त्यांनी व्देष केला नाही. सामाजिक ध्येय समोर ठेऊन त्यांनी दिनदुबळया जनतेसाठी व बहुजनांसाठी आपर परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी जिल्हयाच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय ठेवले आहे असे सांगून ना. पंकजा मुंडे यांनी स्व. मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. भय्युजी महाराजांनी परळी तालुक्यात सुरु केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दलही त्यांनी आभार मानले.
    राज्यमंत्री दिलीप कांबळे, महादेव जानकर, विनायक मेटे, खासदार प्रितम मुंडे, पांडुरंग फुंडकर, फुलचंद कराड यांनी यावेळी आपल्या भाषणातून स्व. मुंडे यांच्या कार्यकर्तत्चाचे विविध पैलू उलगडले.
    भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले की, भगवानगडाच्या विकासामध्ये स्व. मुंडे यांचे महत्वाचे योगदान असून त्यांच्या स्वप्नातील भगवानगडाचा  विकास हेच आमचे पुढचे ध्येय राहणार आहे. भगवानबाबांना आत्मियतेने गुरु मानणारा स्व. मुंडे यांच्यासारखा शिष्य होणार नाही. त्यांच्या स्मृती प्रत्येकानी आपल्या अंत:करणात साठवाव्यात असेही ते म्हणाले.
    राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांनी आपल्या भाषणात स्व. मुंडे म्हणजे माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण होते अशा शब्दात गौरवपूर्ण उल्लेख करुन समाजाच्या विकासाची दुरदृष्टी असणारे आणि खऱ्या अर्थाने लोकनेते म्हणून स्व. मुंडे यांची ओळख अजरामर आहे. त्यांच्यावरची माया कधीही कमी होणार नाही याची जाणीव ठेवावी. संबंधातून समाज कसा निर्माण करावयाचा हे स्व. मुंडे यांच्याकडून शिकावे असे सांगून त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या.
    या समारंभात वैद्यनाथ सर्वांगिण विकास संस्थेच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचे धनादेश देण्यात आले. प्रारंभी ना. पंकजा मुंडे यांनी सर्व मान्यवरांचे तुळशी वृंदावन देऊन स्वागत केले.
    या समारंभास आ. आर.टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, आ. भिमराव धोंडे, आ. माधुरी मिसाळ, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे, रमेश आडसकर, सुजितसिंह ठाकूर, रमेश पोकळे यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर, पदाधिकारी, तसेच स्व. मुंडे यांच्यावर प्रेम करणारे हजारो चाहते उपस्थित होते.
 
Top