वैराग  ( महेश पन्हाळे)  एकीचे खरे बळ ग्रामीण भागात दरवर्षी ठराविक काळात भरणार्‍या यात्रांमधूनच पहायला मिळते. जो बार्शी तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जातो, तोच बार्शी तालुका अध्यात्मिकदृष्ट्या सत्वशीलही समजला जातो. विविध जातीधर्माच्या पंथांच्या अनेक रंगांनी नटलेला हा तालुका पौराणिक महत्वासह भक्ती, श्रध्दा आणि एकतेचा संदेश देतो आहे. गावोगावच्या यात्रा याचेच एक प्रतीक असून सदृढ समाजरचनेच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत.
      लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले व दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे बार्शी दैवत श्री भगवंत ह्यांचे अखिल जगतामध्ये विष्णूंच्या अवतारातील एकमेव मंदिर आहे. मूर्ती शाळीग्रामपासून निर्मित केलेली असून सर्व आभूषणांनी सजलेली आहे. त्यांच्या पाठी श्री लक्ष्मी देवी असून त्यांचे दर्शन आरशामधून घ्यावे लागते. मंदिर रचना हेमाडपंथी असून मंदिराशेजारी बाश्री शहर वसले आहे. बाश्री शहरवासियांसह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील भाविक मोठय़ा संख्येने भगवंतच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे यात्रा काळात खाद्यपदार्थ निर्मिती करण्यांपासून खेळणी, नारळ, फुले, हळदी- कुंकू, गुलाल यासह अन्य उद्योग चांगलेच तेजीत असतात. या यात्रेमुळे बाश्रीमध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते. यात्रेनंतरही वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम भगवंत मंदिरात साजरे केले जातात. श्री भगवंतानंतर वैरागच्या श्री संतनाथांची मोठी यात्रा वैरागमध्ये भरते. राखी पौर्णिमेचा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यात्रा पाच दिवस चालत असल्याने मोठय़ा उत्साहाचे वातावरण सर्वत्र असते. नाथपंथीय असलेले श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यांची संजीवन समाधी वैरागमधील मंदिरात आहे.
      वैरागचे ग्रामदैवत असलेले संतनाथ महाराजांच्या यात्रेची स्वातंत्र्यपूर्व काळात तयार करण्यात आलेल्या मुंबई गॅझेटमध्ये नोंद आढळते. यात्रा काळात पाच दिवस छबिना काढण्यात येतो व मुख्य दिवशी विविध प्रतिकृती तयार करुन लेझीम संघाच्या प्रदर्शनाच्या आणि विविध स्वराच्या निनादामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येते. यात्राकाळात नवनवीन कपडे घेण्याचे पध्दत रुढ झाल्याने कपडे व्यावसायिकांसह वाहतूक, अन्नधान्य, हॉटेल्स, वस्तू भांडार यांच्या विक्रीत प्रचंड वाढ होऊन लाखो रुपयांची उलाढाल होते.
      आगळगाव- सुन्दीवली सादिक अली पिरसाहेब यांचा उरुस मोठय़ा उत्साहामध्ये साजरा केला जातो. हा उरुस दीपावलीच्या आगमनाबरोबर सुरु होतो व भाऊबीजेला संपतो. विशेष म्हणजे या उरुसाला उदीचा मान हिंदू आनंद गरड यांना आहे. त्यामुळे हा उरुस हिंदू- मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक समजला जातो. याच गावातील विठ्ठल मंदिर पुरातन असून सावळा गं विठू माझा असणारा विठ्ठल इथं मात्र गोरापान पहायला मिळतो. या दोन मोठय़ा यात्रा आगळगावात होत असल्याने व्यावसायिक बंधूंमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. तडवळे- श्री भगवती देवीचे स्वयंभू प्रकटन झालेले तडवळे गावामध्ये भोगावती नदीकाठी असलेले देवीचे मंदिर नवरात्रीच्या काळात नऊ दिवस फुलून जाते. हजारो भाविक नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी येतात. विजयादशमी दसरा हा यात्रेचा मुख्य दिवस असून रात्री साडेदहानंतर देवीची सवाद्य मिरवणूक निघते. या काळात पूर्ण गाव विद्युत रोषणाईने सजवण्यात येते. दहा दिवसांच्या या भाविकांच्या रेलचेलीमुळे लाखो रुपयांची उलाढाल होताना आढळते.
       धामणगाव- सावळ्या विठुरायाचे निस्सिम भक्त श्री माणकोजी बोधले महाराज यांच्या भक्तीस प्रसन्न होऊन स्वत: विठ्ठल पंढरपुरातून धामणगावला एकादशीला भेटावयास येतो, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे धामणगावास प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. मंदिर गोलघुमटाचे असल्याने हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. आषाढी आणि कार्तिकीला वैष्णवांचा मेळा इथे जमतो. आज अकरावे वंशपीठाधीश या संस्थानाची देखभाल करीत असून यात्रा काळात गावामध्ये मोठी उलाढाल होते.
        सासुरे- दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सासुरेच्या श्री महांकाळेश्‍वराचे देवळ्यात कडक व नवसाला पावणारे म्हणून प्रसिध्द आहे. श्रीक्षेत्र उज्जैन येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले जोतिर्लिंग सासुरे येथील दयाळराजे आवारे यांच्या भक्तीस प्रसन्न होऊन सासुरे येथे अवतरले. हेमाडपंथी रचनेचे मंदिर अतिशय देखणे आहे. यात्राकाळात भाविक येत असल्याने लाखोंचा व्यवसाय इथे होतो. मालवंडी - मालवंडी गावामध्ये शेखागौरीचे पवित्र स्थान म्हणजे हिंदू- मुस्लिम भक्तांच्या एकतेचे प्रतीक आहे. या ऊरुसावेळी होणारी आकर्षक रोषणाई व शोभेच्या दारुची आतिषबाजी जिल्ह्यात प्रसिध्द पावलेली आहे. या यात्रेमध्ये करमणुकीचे कार्यक्रमही मोठय़ा प्रमाणावर साजरे होतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते.
   या वैशिष्ट्यपूर्ण यात्रांबरोबर गौडगावमधील नागोबाची यात्रा, पानगावच्या भैरवनाथाची यात्रा, आगलावी बावीच्या खंडोबाची यात्रा, यावलीच्या पीरसाहेबांचा ऊरुस, इर्लेची बिरोबा यात्रा, कारीची खंडोबा यात्रा, घाणेगावची मारुती यात्रा, काटेगावचे हजरत सय्यद अल्लाउद्दीन दर्गा, गुळपोळीचे भैरवनाथ, काळेगावचे नृसिंह मंदिर, झरेगावचे रुपादेवी मंदिर अशा अनेक गावांमधून मोठय़ा यात्रा भरतात. यात्रेच्या निमित्ताने परगावी स्थायिक झालेले व नोकरीनिमित्त गेलेले सर्वजण पुन्हा आपल्या गावी येतात. सुख-दु:खाच्या आठवणींसह नावीन्यांची रेलचेल होते. नवा उत्साह संचारतो. या यात्रेतून गावात व गावाबाहेर व्यवसाय करणार्‍यांना चार पैसेही मिळतात. याकरिता प्रशासनाची आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणाही कार्यरत असते. या यात्राकाळात पाहुणचार, सहभावना, अध्यात्म, भक्ती, सेवा, सत्मार्ग, एकता, समाधान, आनंद, प्रेम, मनोरंजन आदी विविध गुणांची पर्वणीच असते.
 

 
Top