उस्मानाबाद -  जिल्हास्तरावर लोकशाही दिन उपक्रमात तक्रार घेऊन येणा-या नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या.
    सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन उपक्रमावेळी त्यांनी या दिनात येणा-या नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. या तक्रारींची दखल न घेणा-या यंत्रणा प्रमुखांवर कार्यवाही करुन त्याचा अहवाल संबंधीत विभागांच्या सचिवांकडे पाठवण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सुनावले.
    विशेषता अवैध सावकारीबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. यापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी विशेष बैठक घेऊन जिल्हा उपनिबंधकांना त्यावर कार्यवाही करण्याचे आणि जिल्ह्यातील अवैध सावकारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, केवळ एका तालुका उपनिबंधकाने यावर कार्यवाही केल्याचे सांगून डॉ. नारनवरे यांनी याप्रकरणी तात्काळ कार्यवाही झाली नाही तर त्याचा अहवाल सहकार विभागाच्या सचिवांना पाठविण्यात येईल, असे सुनावले.
यावेळी त्यांनी लोकशाही दिनात तक्रार मांडण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची तक्रार आस्थेवाईकपणे ऐकून घेतली. तसेच संबंधीत विभागाच्या प्रमुखांना सांगून शक्य त्या प्रकरणांवर त्याच दिवशी कार्यवाहीचे निर्देशही दिले.
जिल्हा पोलीस प्रमुख अभिषेक त्रिमुखे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, उपजिल्हाधिकारी बी. एस.चाकूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. घुगे आदींसह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.  
 
Top