उस्मानाबाद -: जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना येत्या रविवारी (18 जानेवारी) पल्स पोलिओ लसीकरण केले जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील एकही बालक पोलीओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी साकर कारखाने, वीटभट्टया यासह नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतील सर्व ठिकाणी बुथच्या माध्यमातून आणि घरोघरी जाऊन ही मोहीम राबवा, असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.
        येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पल्स पोलीओ लसीकरण मोहिम नियोजनासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी डॉ. नारनवरे यांनी हे निर्देश दिले.उपमुख्यकार्यकारी अधिकारी  रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) टी.के. नवले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बाबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्यासह रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन तावडे, लोकप्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांच्यासहविविध यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
        यावेळी राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेची पहिली फेरी 18 जानेवारी रोजी राबविण्यात येणार आहे.  यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1126 तर शहरी भागात 148 असे एकूण 1274 लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.  जिल्ह्यात 42 प्राथमिक आरोग्य केंद्र, 206 उपकेंद्र, 6 ग्रामीण रुग्णालये, 3 उजिल्हा रुग्णालये, एक जिल्हा रुग्णालय आणि 1 शासकीय आयुर्वेद महाविद्यालय कार्यरत आहे. जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत 5 वर्षांच्या आतील सुमारे 1 लाख 76 हजार 649 बालकांना त्यांच्या पूर्वीच्या लसीकरण स्थितीचा विचार न करता पोलीओ मात्रा दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी आणि त्यानंतर प्रत्यक्ष घरभेटीद्वारे राहिलेल्या बालकांना लस देण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचेही नियोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक वॉर्ड, गाव, वस्ती, तांडा याठिकाणी पोलीओ लसीकरणासाठीच्या बुथचे नियोजन करण्याच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी यावेळी दिल्या.  
 
Top