बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) वार्षिक स्नेहसंमेलनातील सहभागी विद्यार्थ्याच्या मृत्यूने बार्शीतील सुलाखे इंग्रजी माध्यम विद्यालयाचे नाव चर्चेत आले आहे. पार्थ राजेंद्र सातपुते (वय.१३) असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शनिवारी दि.१० रोजी कै.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पार्थ हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असून स्नेहसंमेलनात समूह नृत्याच्या कार्यक्रमात तो सहभागी होता. त्याने सहभाग घेतलेल्या एक गाण्याचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्यानंतर आणखी दुसर्‍या गाण्यातील सहभागापूर्वी थोडा वेळाच्या विश्रांतीवेळी तो रंगमंगचाच्या पाठीमागील विश्रांतीच्या ठिकाणी थांबला होता. इतर विद्यार्थ्यांचीही विश्रांती, रंगीत तालीम व विविध र्चाा, गोंधळ सुरु असतांता इकडे स्नेसंमेलनातील कार्यक्रमांत रंगत आल्यानंतर अचानकपणे आरडाओरड सुरु झाल्याने कार्यक्रम काही वेळ थांबविण्यात आला. यावेळी एका विद्यार्थ्यांच्या डोक्याला मार लागून त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याची धावपळ सुरु झाली. काही वेळात उर्वरित कार्यक्रम आटोपण्यात आले. त्याच्या डोक्याला नेमका कशामुळे मार लागला, नेमके काय झाले होते अथवा इतर कोणत्या घटना घडल्या याबाबत माहिती मिळू शकली नाही.
येथील खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. जामगाव (पा.) ता.बार्शी, येथे पार्थवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांकडे अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार जावळे हे करीत आहेत. संस्थेचे संचालक कवठाळे यांनी सदरच्या प्रकराबाबत हळहळ व्यक्त केली आहे. अंत्ययात्रेसाठी बार्शी एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक व कर्मचारी, मित्र विद्यालय, मळेगावचे हेमंत गडसिंग, तसेच जामगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top