बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- वाहनासंबंधी कोणत्याही प्रकारच्या अपघाताचा विचार केल्यास त्या प्रवासातील सुरक्षीतता व अपघाताची जबाबदारी ही कोणा एकट्याची जबाबदारी नाही असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी व्यक्त केले.
बार्शी आगारातर्फे १ ते १० जानेवारी दरम्यान सुरक्षीतता मोहिम सुरु करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आगारप्रमुख शितल बिराजदार, सहय्यक सदाशिव कदम, वाहतूक निरीक्षक विजय हांडे, लेखापाल मंदार सावंत, बाळकृष्ण बागल, कदम गुरुजी यासह विविध विभाग प्रमुख, कर्मचारी, स्त्री-पुरुष वाहक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाऊस म्हणाले, एसटी महामंडळाची बस सुरक्षीतपणे चालविणार्‍या वाहक चालकांना नेमून दिलेली कामे पूर्ण केल्यानंतरही आणखी काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात येते. त्यांच्या वैयक्तिक कामे, अडचणी, नातेवाईकांच्या भेटी, कुटूंबातील सुख-दु:खाचे प्रसंग, दवाखान्यातील उपचार, मानसिक स्थिती यांचा कसलाही विचार न करता पुन्हा पुन्हा कामाला जुंपण्यात येते याच प्रमाणे पोलिसांनाही काम करावे लागते याचा त्यांच्यावर परिणाम होतो याचा गांभीर्याने विचार करावा.  वाहन चालवितांना ज्या रस्त्यांचा वापर केला जातो त्या रस्त्यांची अवस्था काय असते, चांगल्या दर्जाचे रस्ते शोधून सापडतील काय? अनेक कर्मचार्‍यांना प्रामाणिकपणे काम करतांना नाहक जादा कामांचे ताण येऊन मनस्थिती बिघडते अशा वेळी अत्यंत किरकोळ चुकांमुळेही अपघात होण्याची शक्यता असते. यावेळी वाहनातील प्रवासी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे जीवन विस्कळीत होते व याचे सर्व खापर कर्मचार्‍यांचर फोडण्यात येते. अपघात झाल्यास सर्व त्या बाबींची पडताळणी करुन दोष आहे का नाही हे तपासणेही गरजेचे असते. वरिष्ठांनी सांगीतले म्हणून मोहिम राबविणे असा विचार कर्मचार्‍यांनी मनात आणू नये. सुरक्षीत प्रवासाची जबाबदारी ही कोणा एकट्याची नसून नागरिकांच्या सहकार्याचीही गरज असते. एसटी बसचे चालक हे रस्त्यावर आडवा आलेला साधा उंदीर देखिल मारत नाहीत, कोणत्याही जीवाचा बळी जाऊ नये याची पूर्णपणे खबरदारी घेतात परंतु यांच्या वाहनावर एखादा दुचाकीस्वार येऊन आदळतो व उलटपणे उध्दट वर्तन करुन चुक नसतांना बस चालकांना मानहाणीची भाषा ऐकावी लागते, हे सर्व तो निमूटपणे सहण करतो कारण त्याच्या मनामध्ये पाठीमागे बसलेल्या प्रवाशांना कसलाही त्रास होऊ नये, कोणताही तंटा झाल्यास आपल्या घरातील इतर लोक आपली आतुरतेने वाट पाहत असतील असे अनेक प्रसंग त्याला क्षणात समोर दिसतात. प्रवाशांना आपल्या अधिकारांचा व हक्कांची माहिती असते परंतु कर्तव्याचा विसर पडलेला दिसून येतो. प्रवास करणार्‍या प्रवाशांनाही प्रबोधन करणे गरजेचे आहे. आगारप्रमुख शितल बिराजदार यांनी मागील संपूर्ण महिनाभरात बॉडी कंडीशन महिना साजरा केल्याची माहिती दिली. यापुढे आगार स्वच्छता, सुरक्षा व प्रवाशांना जास्तीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत मिनीटांचा विचार करता देशभरात अपघातातील संख्येबाबत चिंता व्यक्त केली. सहाय्यक आगारप्रमुख एस.बी.कदम व कदम गुरुजी यांनी वाहनाबाबत सविस्तर माहिती सांगीतली.
 
Top