उस्मानाबाद :- पावसाचे जास्तीत जास्त पाणी शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुन:स्थापित करणे, जलस्त्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढणे यासह इतर उपक्रम हाती घेणय्साठी  जलयुक्त शिवार अभियान येत्या 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. उद्योग, सहकारी संस्था यांचाही या मोहिमेत सामाजिक दायीत्वाचा भाग म्हणून सहभाग असावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे या मोहिमेसाठी निवडावीत, असे आवाहन केले असून कारखान्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील दोनशे गावे या अभियानासाठी निवडण्यात येणार आहेत.
         जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, सहकारी बॅंकाचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा उपनिबंधक (सहकार) एस.पी. बडे यांच्यासह पाटबंधारे, वन, जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
         यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, कृषी, जलसंधारण व विविध विभागांच्या समन्वयाने एकात्मिक पद्धतीने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पाणलोट विकासाची कामांमध्येकंपार्टमेंट बंडींग, बांधबंदिस्ती, शेततळे, साखळी सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण व खोलीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, पिण्याचे पाणी स्त्रोत बळकटीकरण, कालवा स्वच्छता अशा प्रकारे कामे हाती घेतली जाणार आहेत. कमी पैसेवारी असलेली गावे, सलग तीन वर्ष टंचाई परिस्थितीचा सामना करावी लागलेली गावे, वाढता लोकसहभाग असलेली गावे, यापूर्वी ज्याठिकाणी जलसंधारणाची कामे सुरु आहेत अशी गावे असा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. त्यातून जिल्ह्यातील दोनशे गावाची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
       जिल्ह्यातील साखर कारखाने, सहकारी बॅंका, राष्ट्रीयकृत बॅंका, औद्योगिक आस्थापना यांची औद्योगिक सामाजिक दायीत्व (सीएसआर) अंतर्गत या जलयुक्त शिवार अभियानासाठी मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे निवडावीत, त्याठिकाणी आवश्यक जलसंधारण कामांसाठी योगदान द्यावे, सहकारी बॅंकांनीही त्यांच्या ऐपतीप्रमाणे किमान दोन तर कमाल दहा गावांची निवड करुन त्याठिकाणी कृषी व संलग्न विभागांच्या साह्याने हे अभियान राबवावे, असे त्यांनी नमूद केले. 
       यावेळी नॅचरल शुगर्स, रांजणीचे अध्यक्ष  व्यवस्थापकीयसंचालक बी. बी. ठोंबरे यांनीही या अभियानात सकारात्मक भूमिका बजावण्याची भूमिका मांडली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, विठ्ठलसाई, भैरवनाथ शुगर, लोकमंगल आदी कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, प्रतिनिधी उपस्थित होते. 
 
Top