वैराग (महेश पन्‍हाळे) :  अनेक कार्यक्रमांमध्ये कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरले जातात. मात्र कार्यक्रम होताच हेच राष्ट्रध्वज काळजी न घेता इतरत्र पडून राष्ट्रध्वजांचा अवमान होतो. असे विविध प्रकार यापूर्वी घडल्याने आता शासनाने प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांवर बंदी घातली आहे. यासंबंधीचे एक परिपत्रकही नववर्षात जारी करण्यात आले असून राष्ट्रध्वजाच्या वापरासंबंधी जनजागृती करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर समितीही स्थापली जाणार आहे.
         भारतीय राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान कायम राखता यावा, याकरिता शासनाने विशेष प्रय▪सुरू केले आहेत. दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे, इतर राष्ट्रीय कार्यक्रम महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येत होता. हे कार्यक्रम झालेनंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज सर्वत्र जमिनीवर इतरत्र पडलेले असतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे याप्रकरणी एक जनहित याचिकाही न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावरती राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानासाठी उच्च न्यायालयाने सुनावणीत निर्देशही दिले आहेत. भारतीय ध्वजसंहितेच्या कलम १.२ ते १.५ मध्ये उचित वापराबाबत तरतूदी देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे उचित आकारामध्ये राष्ट्रध्वज वापरायचे आहेत. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीप्रमाणे करावयाचा असून प्लास्टिक राष्ट्रध्वज वापर करण्याची तरतूद नसल्याने त्यावर बंदी कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात येणार आहे. या समित्याद्वारे अशासकीय संस्था, विद्यार्थी, स्थानिक केबल ऑपरेटर्स व प्रसारमाध्यमांच्या मदतीने जनजागृती करण्यात येणार आहे. विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब जालेले व माती लागलेले राष्ट्रध्वज इतरत्र आढळल्यानंतर ते गोळा करुन तालुका व जिल्हास्तरावर निर्माण केलेल्या यंत्रणेकडे सुपूर्त करण्याचे अधिकारही अशासकीय संस्था तसेच संघटनांना देण्यात आले आहेत.
   भारतीय ध्वज संहितेप्रमाणे राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी बाश्री तालुक्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्याकरिता समिती स्थापन करण्यात येत असल्याचे निवासी तहसीलदार उत्तम पवार यांनी सांगितले.

 
Top