उस्मानाबाद -  राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचीत्य साधून मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने मराठवाड्यातील बुजुर्ग उर्दू शायर शम्स जालनवी यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सोमवार, १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील जिल्हा न्यायालयाशेजारील मेघमल्हार सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शम्स जालनवी आणि मराठी गझलकार सुधीर मुळीक यांच्या मिलाजुला मुशायर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे.
       वेदनेचा उत्सव साजरा करीत आपल्या हृदयस्थ शायरीने शम्स जालनवी यांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आनंदी वृत्तीने खडकाळ जीवनाला सामोरे जात आपण जोपासलेला स्वाभिमान आपल्या शायरीतून व्यक्त करणारे शम्स जालनवी यांचे सबंध जीवनच जणू एक मुशायरा आहे. जीवनमुल्य काळजात जपून कलंदरपणे मानवी दुःखाचा ठाव घेणार्‍या या मनस्वी शायराचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे. ११ हजार रूपये रोख, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. त्याचबरोबर याचवेळी उर्दू-मराठी मिलाजुला मुशायरा पार पडणार आहे. यात स्वतः शम्स जालनवी आणि मुंबई येथील प्रसिध्द मराठी गझलकार सुधीर मुळीक आपल्या गझलांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत. या मुशायर्‍याचे निवेदन कवी रवींद्र केसकर हे करणार आहेत. शहर व परिसरातील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद, शाखा उस्मानाबादचे अध्यक्ष नितीन तावडे, कार्याध्यक्ष राजेंद्र अत्रे, सचिव बालाजी तांबे, उपाध्यक्ष डी. के. शेख यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

 
Top