उस्मानाबाद -  एक दुरगामी व शाश्वत धोरण म्हणून आपण राज्यातील जलस्त्रोतांच्या व्यवस्थापनाला सर्वोच्‍च प्राधान्य दिले पाहिजे,असे  प्रतिपादन राज्यपाल  सी.  विद्यासागर राव यांनी आज केले. 
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय ग्रामीण युवक महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक प्रा. एस. परशुरामन, उपसंचालक प्रा.अब्दुल शाबान आदिंसह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व देशाच्या विविध भागातून आलेले युवक उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, कृषी विकासावर चर्चा वृध्दींगत करण्यासाठी असे युवक महोत्सव सर्व विद्यापीठांनी विशेषत: शेतकी विद्यापीठांनी घ्यावेत. गरीब आणि असुरक्षित गटांचे सबलीकरण आणि सर्व समावेशक विकासाच्या प्रक्रीयेत महत्वाची भूमीका पार पाडणारी  टाटा सामाजिक विज्ञान संस्था ही एक महत्वाची संस्था आहे. तुळजापूरात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या परिसराची स्थापना करणे ही एक चांगली सुरुवात होती. राज्याच्या मागास भागातील विद्यार्थ्यांना संस्थेंच्या विशिष्ट शिक्षणाचे फायदे देणे या संस्थेचे वेगळेपणा आहे.
राज्यपाल पुढे म्हणाले की, जागतिकीकरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत एक मोठे परिवर्तन घडले आहे. गेल्या 20 वर्षात अन्नधान्य आणि कृषी उत्पादनात वाढ झालेली आहे. पण सकल घरगुती उत्पादनात शेतीचा वाटा खाली आला आहे. तो स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातील 52 टक्क्यांवरुन सध्या 13 टक्क्यावर आलेला आहे. असे असले तरी शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या काही कमी झालेली नाही. यामुळे ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढती दरी निर्माण झालेली आहे. योग्य रोजगारांच्या संधी ते शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, दळणवळण आणि आरोग्य अशा सामाजिक व भौतिक पायाभूत सुविधांपर्यंत ग्रामीण भागाला अनेक समस्या भेडसावत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचा कल शहरी भागांच्या विकासाच्या बाजूने जात असल्याने ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहीला आहे. त्यामुळे आपल्याला शेती आणि शेती विस्तार सेवा ग्रामीण भागात बळकट करुन ग्रामीण युवकांना कौशल्याआधारीत शिक्षण दिले पाहिजे, असे राज्‍यपालांनी स्पष्ट केले.
तसेच घटनेच्या कलम 371 (2) नुसार विदर्भ, मराठवाडा व उर्वरीत महाराष्ट्रातील मागासलेल्या भागाच्या विकासासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून विशेष जबाबदारी असल्याने या विभागाचा संतूलीत विकास  निश्चित करण्यासाठी शासन सर्व शक्य पावले उचलित असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात शासन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे,असे राज्यपालांनी स्पष्ट केले.
विकसीत देश बनण्याचे भारताचे ध्येय अशा संस्थांच्या प्रत्येक प्रयत्नातून साध्य होईल तसेच भ्रष्‍टाचार या विकासातील मुख्य विकृती विरोधात लढ्यात तरुणांनी सहभाग घेवून सुशासन आणण्यात मुख्य भुमिका बजावण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. यावेळी  संस्थेच्या ग्रामदुत पुरस्कारांनी युवकांना राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.        
यावेळी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार मधुकरराव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्‌रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपसंचालक प्रा. शाबान यांनी केले.

 
Top