उस्मानाबाद :- जिल्ह्यातील भावी शिक्षकांनी शुक्रवारी येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा स्टेडिअमवर आपले क्रीडा कौशल्य अजमावले. खो-खो आणि कबड्डीसह वैयक्तिक क्रीडाप्रकारातही या भावी शिक्षकांनी आपले कौशल्य पणाला लावले. निमित्त होते, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आंतरअध्यापक विद्यालयीन क्रीडा व विविधांगी स्पर्धेचे!
या स्पर्धेत जिल्ह्यातील डायटसह 12 अध्यापक विद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला. विविध विदयालयांच्या छात्र अध्यापकांनी केलेले शानदार संचलन आणि त्यानंतर विविध संघांमध्ये रंगलेले सामने प्रेक्षणीय ठरले. त्यांच्या पाठीराख्या विद्यार्थ्यांनी दिलेली शाबासकी या छात्र अध्यापक क्रीडापटूंचा आनंद वाढविणारा ठरली.
या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे, खो-खो संघटनेचे बिभीषण पाटील यांच्यासह विविध अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर छात्र अध्यापक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी  खिलाडूवृत्ती दाखविण्याची प्रतिज्ञा घेतली. 
श्री. चव्हाण यांनी शैक्षणिक विकासाबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक विकास महत्वाचा असल्याचे सांगितले. प्राचार्य श्रीमती आवटे यांनी भावी शिक्षकांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी खेळ आवश्यक असल्याचे सांगून सहभागी छात्र अध्यापक, संबंधीत विद्यालये आणि त्यांचे प्राचार्य व शिक्षक यांचे आभार व्यक्त केले. 
या स्पर्धेत डायटसह श्रमजीवी अध्यापक विदयालय, नळदुर्ग अध्यापक विद्यालय, तुळजाभवानी अ. वि.उमरगा, पांडुरंग अध्यापक विद्यालय, आष्टामोड, भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब, सर्वोदय, वाशी, आर.पी., उस्मानाबाद के.टी. पाटील अध्यापक विद्यालय, उस्मानाबाद आदी अध्यापक विद्यालयांनी सहभाग घेतला. 
या क्रीडास्पर्धेसह विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे आनंदनगर येथील सभागृहात होणार असून स्पर्धेचा समारोप शनिवार, दि. 3 रोजी होणार आहे.
 
Top