सोलापूर :– करमाळा तालुक्यातील कोर्टी गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनानंतर पोटदुखी व उलट्याचा त्रास होवू लागल्याने करमाळा व सोलापूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, कामगार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी करुन विचारपूस करुन उपचाराबाबत निर्देश दिले.
     यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, जिल्हा शल्यचिकित्सक      डॉ. एम.आर.पटणशेट्टी आदी उपस्थित होते. 
      मध्यान्ह भोजनानंतर 70 विद्यार्थ्यांना पोटदुखी व उलटीचा त्रास होवू लागल्याने उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांना जास्त त्रास होवू लागल्यामूळे सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांची पालकमंत्री श्री. देशमुख यांनी भेट घेवून पाहणी करुन विचारपूस केली. तसेच चांगले केले जाईल, घाबरु नका, असा विद्यार्थ्यांना व पालकांना आधार दिला.
    या घडल्या प्रकाराबाबत पालकमंत्री देशमुख यांनी माहिती घेवून रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच करमाळा येथे उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत तेथील वैद्यकीय अधिका-यांशी संपर्क साधून वेळेवर काळजी घेवून उपचार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

 
Top