बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- लहान मुलांवर चांगले संस्कार करणार्‍या वारकरी शिक्षण संस्थेसारख्या संस्थेतून देशभर चांगली संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. चांगले संस्कार झाल्यास कोणी कोणावर अन्यायच करु शकणार नाही व त्यामुळे गृहखाते अथवा पोलिसांचीही गरज राहणार नाही असे प्रतिपादन ह.भ.प. प्रभाकरदादा बोधले महाराज यांनी व्यक्त केले. वै.ब्र.ह.भ.प.व्यंकटेश मांजरे वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या उपळाई रोड येथील अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या किर्तनात भाविकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. मागील १६ वर्षांपासून दरवर्षी या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
बोधले महाराज म्हणाले, आजकाल मुलांच्या शिक्षणाचे प्रमाण चांगले आहे. शालेय शिक्षण जरी घेतले तरी मुलांना संस्काराची गरज आहे, आई-वडिलांना कुणी विचारत नसल्याचे व सासू सासर्‍यांचा सन्मान केल्याचे दिसून येते त्यावेळी कशी दुनिया झाली बेईमान असे म्हणण्याची वेळ येते. याकरिता पितृ देवो भव, आचार्य देवो भव ही संस्कृति शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. संस्कार झाल्यावर संस्कृति टिकेल, संस्कृति टिकली तर देश टिकेल. संस्कृती आणि संस्काराची असलेली गरज पाठशाळेमार्फत पूर्ण करण्याचे काम वारकरी शिक्षण संस्थेसारख्या ठिकाणाहून होत आहे. विद्यार्थ्यांवर होत असलेले संस्कार पाहून आपणास समाधाना वाटत आहे.

 
Top