बार्शी - शहरातील अवैध दारु विक्री, मटका, गांजा विक्री, वाळू तस्करी आदी प्रकारचे बेकायदा धंदे बंद करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले आहे. यामध्ये राजरोजसपणे व खुलेआम अनेक अवैध व्यावसायिक दारु विक्री करतात, अनेक ठिकाणी मटका व्यावसायिक दिसून येतात, गांजा विक्री तसेच पत्त्यांच्या जुगारांचे क्लब आणि वाळू तस्करांकडून वाळूची चोरी होत असल्याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
 
शाळा, कॉलेज, बँक, रहिवासी ठिकाणे, कोर्ट, हॉस्पिटल, बस स्थानक आदी परिसरात या अवैध व्यावसायिकांनी वेढले आहे. या प्रकारांमुळे महिलांना विधवा होण्याची वेळ येत असून महिलांवर कुटूंब सांभाळण्याचा अतिरिक्त भार पडत आहे. महिलांना रोजगाराने कामाला जावून मिळालेला पैसा वाढत्या व्यसनाधिनतेमुळे वाया जात आहे. तरुण पिढी यामुळे बरबाद होत असून गुंडगिरी प्रवृत्तीकडे वळत आहे. गरिबीचे प्रमाण वाढत आहे व चांगला समाज घडण्यापासून वंचित राहत आहे.
याबाबत तात्काळ दखल घेवून कारवाई करावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कडक शासन करावे. १५ दिवसांत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर गणेश शिंदे, बाबासाहेब खडतरे, वसंत कांबळे, किशोर कांबळे, बाळू कांबळे, प्रदिप घरबुडवे, वसंत चव्हाण, सचिन सोनवणे, सतिश डोळसे, भिमराव गायकवाड, दयानंद शिंदे, दिपक बोकेफोडे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 
Top