बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालून स्वत:ही भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप करुन राऊत गटाच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला. तर कोणतीही करवाढ दरवाढ नाही व यंदाचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याचे सांगत बहुमताच्या जोरावर सत्ताधारी सोपल गटाच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पीय विधेयक मंजूर केले.
बार्शी नगरपरिषदेच्या कै.भाऊसाहेब झाडबुके स्मारक सभागृहात शनिवारी दुपारी ही सभा पार पडली. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रमेश पाटील यांनी पदभार सांभाळला. विषयाचे वाचन झाल्यानंतर विरोधी पक्षाचे स्विकृत नगरसेवक अशोक बोकेफोडे यांनी सत्ताधार्‍यांवर शाब्दिक हल्ला चढवला. घटनेतील तरतुदीनुसार लेखा संहितेप्रमाणे भांडवली उत्पन्न, मुळ अंदाजपत्रक, सुधारित अर्थसंकल्प यातील तफावत, सादरीकरणाची चुकीची पध्दत, महसूली उत्पन्न, प्रॉपर्टी टॅक्स, संकलीत कर याकडे दुर्लक्ष केले, महसूली उत्पन्नात तुट झाली. कर आकारणी बेकायदा केली, भांडवली मुल्यावरील ठराव करुनही आकारणी केली नाही त्यामुळे पाच ते सहा कोटीचे नुकसान झाले. सक्षम अधिकारी नसल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. मुख्याधिकारी यांनी जमाखर्चावर नियंत्रण ठेवणे बंधनकारक असतांना कर्तव्यात कसूर केली. अ वर्ग नगरपालिका असतांना मुख्याधिकारी अनेक वेळा गैरहजर राहतात, आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत मुख्याधिकारी दिसून येत नाहीत, विभाग प्रमुख, अभियंते सातत्याने गैरहजर राहतात, विनापरवाना बांधकामाच्या घरपट्टी दुप्पटीने वसूल कराव्या. शॉपींग सेंटरमधील गाळे रिकामे असूनसही त्याचे लिलाव होत नाहीत. गाळेधारकांकडील थकबाकी वाढली आहे. सफाईच्या ठेक्यात उल्लेख नसतांनाही बिलांची आकारणी करण्यात येते. अंतर्गत लेखा परिक्षण करुन जादा पैशांची वसूली ठेकेदाराकडून करावी. खतनिर्मिती प्रकल्पासाठी लाखो रुपयांचा खर्च करुनही त्याचे उत्पन्न मिळाले नाही, यासाठी पुरवठा करण्यात आलेली मशिनरी मानांकित नाही. भुयारी गटार योजनेसाठी केंद्रासोबत राज्य शासनाची मंजूरी असल्याशिवाय टेंडर काढता येत नसतांनाही मुख्याधिकारी यांनी टेंडर काढले. कायद्यात तरतुद नसतांना पाटपेमेंट करण्यात येते. प्रथमेश कन्स्ट्रक्शनच्या बाबतही अशाच प्रकारे धनादेश देण्यात आला होता आपल्या तक्रारीनंतर त्याची वसूली करण्यात आली. नागरिकांच्या पैशाचा योग्य रितीने विनीयोग होत नाही व यातून भ्रष्टाचार होत आहे असे बोकेफोडे यांनी आरोप केल्यानंतर राऊत गटाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
बोकेफोडे यांच्या आरोपाला उत्तर देतांना स्विकृत नगरसेवक गटनेते नागेश अक्कलकोटे यांनी बोकेफोडे हे गोधळलेले आहेत प्रत्येक विषयावर सोयीस्कर अथ लावण्यात येतो. अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे मुद्दे नाहीत, मागील तीन वर्षांपासून विरोधासाठी विरोध करण्याचे मुद्देच तसेच व बेछूट आरोप त्यांनी आताही वाचून दाखविले आहे. यावर्षीचे दिडशे वर्षांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. कोणत्याही प्रकारची करवाढ दरवाढ न करता नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे त्याचा विविध विकासकामांसाठी उपयोग होणार आहे. शहरातील नगरपालिकेच्या शाळा विस्तारित भागात स्थलांतरीत करणे, मोकळ्या जागी मिनी संकुले उभारणे, घर तेथे नळ, घर तेथे शौचालय, शहरात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे, क्लिन सिटी ग्रीनसिटी,करदात्यांसाठी अपघाती विमा योजना, क्रीडा संकुल, भगवंत मैदानावर सुसज्ज क्रिडांगण, ओला सुका कचरा व्यवस्थापनासाठी घरटी मोफत कचरापेटी, विद्यार्थ्यांना वृक्षाची रोपे, ग्रामदैवत भगवंत जयंती उत्सव, दिडशे वर्षांतील विशेष घडामोडींची स्मरणीका , गुणवंतांचा गौरव, पुतळा पार्क, डिजीटल फलक उपविधी, ऍम्युजमेंट पार्क, गणेश तलाव पथदर्शी प्रकल्प, जीआयएस मॅपींग, अत्याधुनिक कत्तलखाने, मत्स्य व्यवसाय आदी चांगले प्रकल्प कोणत्याही कर-दरवाढीशिवाय राबविण्यात येत आहेत. कर्मचार्‍यांना वेळोवेळी वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यात येते. चांगल्या प्रकारचे काम सुरु असतांनाही विरोधकांकडून छुपे डाव आखून महसूली उत्पन्न बुडविण्याचा घाट घालण्यात येतो नगरपरिषदेच्या मार्फत विविध विकासकामांचे काम करतांना ती क्रांती म्हणून बघू नये ते केवळ परिवर्तन आहे. विरोधकांनी त्यांच्याकडे सत्ता असतांना काय केले याचाही आढावा घ्यावा असेही अक्कलकोटे यांनी सांगीतले.

 
Top