बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शासनाच्या वतीने भाजपाचे राजेंद्र मिरगणे यांची प्रशासक मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याने तालुक्यातील वैराग (ता.बार्शी) येथील भोगावती उर्फ संतनाथ सहकारी साखर कारखान्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कारखान्याच्या शेकडो एकर जमीनीची विक्री करुन कारखान्याचे कर्ज फेडून कारखाना सुरु करु असे म्हणत कारखान्यासाठी न्यायालयीन लढा देणार्‍या विश्‍वास पाटील यांच्या करिता मिरगणे यांची न्यायालयात २५ लाख रुपये भरल्याचे म्हटले आहे. कारखान्याची जमीन विकण्याचा भाजपाचे मिरगणे यांनी घाट घातला आहे तर शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी कारखान्याची एक इंचही जागा न विकता चांगल्या पध्दतीने कारखाना चालवू, किमान दहा वर्षे कारखाना चालविण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी सर्व देणी फेडू, त्याबाबत मत न्यायालयात सादर करु असेही आंधळकर यांनी म्हटले आहे.
मागील अनेक वर्षांपासून आमदार दिलीप सोपल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संचालक मंडळाच्या धोरणामुळे कारखाना बंद पडल्यानंतर दोन जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मागील पाच वर्षांपासून भोगावती साखर कारखाना बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर आणि इतर सहकार्‍यांनी कारखाना वाचविण्यासाठी न्यायालयीन लढा सुरु ठेवला होता. राज्य शासनाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीमध्ये शिवाजी संकपाळ, धनेश जाधव, सुनील पाटील,विश्‍वास पाटील,चांगदेव पौळ, अजितकुमार देशपांडे यांचा समावेश आहे. वैराग येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची शेकडो एकर जमीन असून कारखान्याची मशिनरीही थोडासा भाग वगळता अत्यंत चांगल्या स्थितीतील आहे. किरकोळ खर्च करुन सदरचा कारखाना पुन्हा सुरु करता येतो. परंतु कारखाना सुरु करुन शेतकर्‍यांच्या ऊसाचा प्रश्‍न सोडविण्यापेक्षा कारखान्याच्या जमीनीवर डोळा ठेवून राजकिय भूमिका बजावत वरिष्ठ पातळीवरुनही षडयंत्र करुन कारखाना विकण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला आहे.
 
Top