पुणे (एकनाथ पवार) पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोशी येथे कचरा डेपो आहे. याठिकाणी संपूर्ण शहरात दररोज निर्माण होणारा सुमारे ६०० टन कचरा जिरवला जातो. या कचरा डेपोपासून महापालिकेने ५०० मीटर अंतरापर्यंत “बफर झोन”ची हद्द निश्चित केली होती. मात्र त्याला प्रशासनाने कोणाताही शास्त्रीय आधार दिला नव्हता. त्यामुळे या कचरा डेपोपासून ५०० मीटरच्या आत राहणा-या नागरिकांना महापालिकेने मुलभूत सोयी व सुविधा देण्याचे बंद केले होते. परिणामी येथील हजारो नागरीक महापालिकेचे करदाते असूनही हक्काच्या सुविधांपासून वंचित राहिले होते. त्यामुळे मोशी कचरा डेपोच्या “बफर झोन”चे अंतर कमी करण्याची येथील नागरिकांची मागणी होती. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. तसेच त्या त्या वेळच्या महापालिका आयुक्तांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन देऊन भाजपने पाठपुरावा केला आहे.
      राज्यात गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारची सत्ता होती. या सरकारचे तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत सर्वांना “बफर झोन” चे अंतर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र मोशी कचरा डेपोच्या “बफर झोन”च्या प्रश्नाचे वर्षानुवर्षे भिजत घोंगडे ठेवण्यातच आघाडी सरकारने धन्यता मानली. परिणामी कचरा डेपो परिसरातील नागरिकांना तब्बल १५ वर्षे आपल्या हक्काच्या सुविधांपासून वंचित राहावे लागले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला धूळ चारत सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या तीनच महिन्यात “बफर झोन”बाबत नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मोशी कचरा डेपोपासून बफर झोनचे अंतर ५०० मीटरवरून १०० मीटरपर्यंत करण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. एवढेच नाही तर आघाडी सरकारने गेल्या १८ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वगळलेल्या क्षेत्राचा विकास आराखडा लटकवून ठेवला होता. त्यालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका झटक्यात मंजुरी दिली आहे. शहराचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न सोडविण्याचे कित्येकदा आश्वासन देऊन प्रत्यक्षात तो १५ वर्षे सोडविलाच नाही. या प्रश्नांचे केवळ राजकारण करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे “बफर झोन”चा प्रश्न सोडविण्याचे संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जाते. त्यामुळे शहर भाजपच्या वतीने व मोशी कचरा डेपो परिसरातील तमाम जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मोशी परिसरातील सुज्ञ जनतेला हा प्रश्न कोणी सोडविला हे कळत असल्याने त्यांना गृहित धरून “बफर झोन”चा प्रश्न आम्हीच सोडविल्याचे सांगणा-या इतर पक्षाच्या नेत्यांना सुज्ञ जनतेला “नो ऊल्लू बनाविंग” असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

 
Top