बार्शी -   तालुक्यातील वैराग भागामध्ये मित्रप्रेम संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोेपयोगी उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झा
लेल्या युवकाचे पुण्यात अपघाती निधन झाले. गोरख महादेव काशीद (वय २२, रा.दहिटणे ता.बार्शी) असे गुरुवारी अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पुणे येथे पीएमटी वाहन चालक पदासाठी मुलाखतीस त्याला बोलावणे आले होते. दरम्यान औंध रस्त्यावरुन जातांना त्याला चक्कर आल्याने तो खाली पडल्यावर त्याच्या डोक्यास मार लागला, जखमी अवस्थेतील गोरख यास एका रिक्षाचालकाने जवळच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्याच्याकडील कागदपत्रांवरुन त्याच्या नानेवाईकांना सदरची हकीकत सांगण्यात आली. अपघातामध्ये डोक्याला मार बसल्यानंतर त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता.
 गोरख याने वैराग परिसरात मित्रप्रेम संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांना दत्तक घेऊन शिक्षणाचा खर्च करणे, आधारवड हरवलल्यानंतर सक्षमपणे कुटूंबाचे पालनपोषण करणार्‍या महिला, पुरुष, मुलांचा गौरव, व्यसनमुक्ती, वृक्षारोपन, शालेय साहित्याचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य अशा प्रकारचे कार्य मागील तीन वर्षांपासून केले आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडिल, आजी, दोन भाऊ असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त समजताच दहिटणे, मुंगशी तसेच वैराग भागात शोककळा पसरली. दहिटणे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top