उस्मानाबाद -  जिल्ह्यातील छायाचित्र मतदार ओळखपत्रातील माहितीमध्ये ईपीक नंबर, आधार नंबर, मोबाईल क्रमांक, ई-मेल आदी माहितींची सांगड घालून ती प्रमाणित करण्याचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक यंत्रणेने सुरु केला आहे. राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रम  (एनईआरपीएपी) अंमलबजावणीचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली.
या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन मतदारांची माहिती गोळा करणार आहेत. याशिवाय, मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी हे  मतदार सुविधा केंद्र, ई-सुविधा केंद्र व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्राधीकृत केलेल्या नागरी सेवा केंद्रांवर ही माहिती गोळा करणार आहेत. यासाठी मतदान केंद्र जागृती गट स्थापण्यात येणार असून यात मतदान केंद्रस्तरीय शासकीय कर्मचारी , पॅरा वर्कर्स, स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी, मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता, मतदान केंद्रस्तरीय  स्वयंसेवक, मतदान केंद्राजवळील शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी, एनएसएस/नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक, स्थानिक अराजकीय नागरी सेवा संघाचे स्वयंसेवक यांचा या गटात सहभाग असणार आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत 12 एप्रिल, 2015 (रविवार) रोजी विशेष मोहिम आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  याशिवाय, 17 मे, 21 जून आणि 12 जुलै रोजीही अशाच पद्धतीची मोहिम आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मतदारांची दुबार नावे वगळली जाणार असून मतदारांनीही त्यांचे स्थानिक रहिवास असलेल्या ठिकाणच्या मतदार यादीत असलेले नाव सोडून इतर ठिकाणी असलेल्या मतदार यादीतील नाव स्वत:हून वगळण्यासाठी नमुना-7 मध्ये अर्ज करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच ज्या मतदारांना त्यांच्या छायाचित्र मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करुन घ्यावयाच्या आहेत, त्यांना नमुना-8 अर्ज भरावा लागणार आहे.       
 
Top