उस्मानाबाद -  उस्मानाबाद शहर पोलीस कोठडीत आत्महत्या केलेल्या अनाळा येथील सहायक पोलीस फौजदार समीयारहेमान अजीजोरहेमान काझी यांच्या मृत्यूप्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी करण्यासाठी  उपविभागीय दंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांना याबाबात त्यांचे म्हणणे सादर करावयाचे असेल तर त्यांनी 7 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कार्यालयात पुराव्यासह हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
काझी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी 13 नोव्हेंबर 2014 रोजी आनाळा, ता. परंडा या ठिकाणी अटक केली होती.  त्यानंतर काझी यांना 14 नोव्हेंबर रोजी उस्मनाबाद शहर पोलीस ठाणे कोठडीत ठेवण्याकरिता आणून दिले होते. त्यानंतर काझी यांनी कोठडीच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या  केल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (2/1974) मधील तरतुदीनुसार दंडाधिकारीय चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी मयताच्या नातेवाईकास काझी यांच्या मृत्युबाबत काही माहिती किंवा त्यांचे काही म्हणणे सादर करावयाचे असेल तर सबळ पुराव्यासह 7 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, उस्मानाबाद यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन जाहीर प्रगटनाद्वारे करण्यात आले आहे.

 
Top