नळदुर्ग -  येथील घरगुती वापराच्‍या गॅस ग्राहकांच्‍या सबसिडी बँकेच्‍या खात्‍यावर गेल्‍या दोन महिन्‍यापासून जमा न झाल्‍याने लाभार्थी गॅस ग्राहक बँकेत व गॅस वितरण कार्यालयात वारंवार चकरा मारीत असून गॅस वितरकाच्‍या कारभाराबद्दल ग्राहकातून तीव्र संताप व्‍यक्‍त केला जात आहे. दरम्‍यान नवीन वर्षापासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार असल्‍याच्‍या शासनाच्‍या या आदेशाला येथे हरताळ फासल्‍याचे दिसून येत आहे.
   नळदुर्ग येथे हिन्‍दुस्‍तान पेट्रोलिअम कंपनीची गॅस एजन्‍सी वैशाली गॅस एजन्‍सीकडे होती. मात्र वैशाली गॅस एजन्‍सीकडून दि. 19 डिसेंबर 2014 रोजी कळंबच्‍या तेजल गॅस सर्व्हिसकडे नळदुर्गची पर्यायी व्‍यवस्‍था करण्‍यात आली. नळदुर्ग शहर व परिसरातील घरगुती गॅस कनेक्‍शन जवळपास अकरा हजार एवढे आहे. पर्यायी व्‍यवस्‍थेनंतर गॅस सिलिंडर पुरवठयात या न त्‍या कारणाने व्‍यत्‍यय आल्‍याचे दिसून आले. नळदुर्गची पर्यायी व्‍यवस्‍था केल्‍याने व गॅस वितरक नवीन असल्‍याने ग्राहकांनी सुरूवातीपासूनच गैरसोयी सहन केले. मात्र अनेकांचे दोन महिने उलटले तरी ग्राकांच्‍या बँक खात्‍यात आद्यापही अनुदान जमा केले नाही. याबाबत अनेक ग्राहक बँकेत व गॅस वितरक कार्यालयाकडे चकरा मारीत आहेत. कार्यालयात मात्र उपस्थित कर्मचारी संगणकावर संबंधित पेज ओपन होत नसल्‍याचे सांगून तुम्‍ही बँक खात्‍यावर अनुदान जमा झाले का बँकेतच पाहण्‍याचा सल्‍ला दिला जातो. पूर्वी वैशाली गॅस एजन्‍सीकडे अनेक ग्राहकांच्‍या मध्‍यंतरी बँकेत अनुदान जमा झाले होते. अशा ग्राहकांचे‍ही अनुदान दोन - दोन महिने झाले तरी बँक खात्‍यावर जमा होत नसल्‍याचे उघडकीस आले आहे. 
       थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील अनुदान संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यात जमा न झाल्‍याने ग्राहाकातून संताप व्‍यक्‍त केला जात आहे. दरम्‍यान महाराष्‍ट्र राज्‍यात व उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात एच.पी. चे वितरक असून नळदुर्ग पासून उस्‍मानाबाद जवळ असताना कंपनीच्‍या संबंधित अधिका-यांनी उस्‍मानाबाद ओलांडून कळंब येथील गॅस सर्व्हिसकडे पर्यायी व्‍यवस्‍था करण्‍यामागचे गौडबंगाल काय ? असा प्रश्‍न सर्वसामान्‍य नागरिकांतन विचारला जात आहे. याप्रकरणी तेजल गॅस सर्व्हिसचे कुलकर्णी यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता ते फोन उचलले नाही. याप्रकरणी जिल्‍हाधिका-यांनी चौकशी करून येथील ग्राहकांना न्‍याय द्यावा. व अन्‍य गॅस वितरकाकडे पर्यायी व्‍यवस्‍था करण्‍याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. 

 
Top