उस्मानाबाद - संतांच्या मांदियाळीत संतश्रेष्ठ म्हणून ख्याती असलेल्या गोरोबा काकांची दिंडी पंजाबमध्ये रंगणार आहे. घुमान येथे यंदा होऊ घातलेल्या ८८ व्या साहित्य संमेलनासाठी गोरोबा काकांच्या दिंडीत जिल्ह्यातील १९० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. गोरोबा काकांचे अभंग, वारकरी पताका, टाळ, मृदंग आणि गोरोबा काका आणि नामदेवांच्या भेटीचा देखावा या दिंडीतून पंजाबवासीयांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने जय्यत तयारी सुरू केली आहे. 
            यंदा घुमान येथे होणार्‍या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मराठवाड्यातील भूमीत जन्मलेले आणि पंढरीच्या विठ्ठलाचा कृपाशीर्वाद घेऊन सबंध हिंदुस्थानभर वारकरी सांप्रदायाची पताका घेऊन जाणारे संत नामदेव यांच्या कर्मभूमीत हे संमेलन ३, ४ आणि ५ एप्रिल रोजी होत आहे. उस्मानाबादकरांसाठी हे संमेलन जिल्ह्याच्या इतिहासाला उजाळा देणारे आहे. संत नामदेव यांची परिक्षा घेणार्‍या संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पावन भूमीत बाराव्या शतकात पहिला मराठी सारस्वतांचा मेळा झाला होता. त्याला संत ज्ञानेश्‍वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, विसोबा खेचर, संत नामदेव यांच्यासह तत्कालीन संत मंडळी जमली होती. याच ठिकाणी चिमुकल्या मुक्ताईने नामदेवांच्या ठायी असलेला अहंकार गोरोबा काकांच्या निदर्शनास आणून दिला. गोरोबा काकांनी नामदेवांचे मडके अजून कच्चे आहे, असे सांगत ‘गोरा म्हणे कोरा, राहिला गं बाई शुन्यभर नाही भाजिला कोठे’ या अभंगओळी लिहून ठेवल्या आहेत. त्यानंतर संत नामदेवांनी आत्मपरिक्षण करीत मूळ बार्शीचे असलेले आणि औंढा नागनाथ येथे वास्तव्यास असलेल्या विसोबा खेचरांचा अनुग्रह प्राप्त केला. त्यांना गुरुस्थानी मानून पुढील कामाची दिशा ठरविली आणि सबंध हिंदुस्थानात वारकरी सांप्रदायाची पताका पोहचविण्याचे अलौकीक कार्य केले. 
तेर येथे बाराव्या शतकात झालेली संत मंडळींची सभा खर्‍या अर्थाने पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्याची श्रध्दा उस्मानाबादकर आजही बाळगतात. संत नामदेव गोरोबा काकांच्या भेटीसाठी तेर येथे मोठ्या श्रध्देने येवून गेले. तीच श्रध्दा मनात ठेवून उस्मानाबाद मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने यंदा घुमानमध्ये गोरोबा काका आणि नामदेव महाराजांची अलौकीक भेट घडविण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातून १९० गोरोबा काकांचे प्रतिनिधी संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीत पताका घेऊन मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. त्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने महाराष्ट्रासह पंजाबमधील नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. 
गोरोबा काका ही उस्मानाबादकरांची ओळख वारकरी सांप्रदायात आदराचे स्थान असलेले संतश्रेष्ठ गोरोबा काका हीच खरी उस्मानाबादकरांची ओळख आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात गोरोबा काकांची दिंडी मोठ्या उत्साहाने काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. १९० पेक्षा अधिक जणांनी या दिंडीत सहभागी होण्यासाठी प्रतिनिधी शुल्क जमा करून नोंदणी केली आहे. बुधवार, ३१ मार्चला सायंकाळी ५ वाजता हे सर्व गोरोबा काकांचे प्रतिनिधी नाशिक येथून रेल्वेने घुमानकडे मार्गस्थ होणार आहेत. तेथे वारकर्‍यांच्या पोशाखात, फेटे, पताका, टाळ, मृदंग आणि गोरोबा काका आणि नामदेव महाराजांच्या अभंगाचे फलक घेऊन पंजाबवासीयांना गोरोबा काकांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोरोबा काकांच्या मार्गदर्शनामुळे निर्माण झालेल्या घुमान या नामदेव महाराजांच्या कर्मभूमीत रंगणारी ही दिंडी ऐतिहासिक ठरेल, असा विश्‍वास मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी व्यक्त केला. 

 
Top