उस्मानाबाद -  आपत्ती व्यवस्थापनातील संभाव्य धोके लक्षात घेऊन जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज राहावी, यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी निधीचे स्त्रोत शोधण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबंधित विभागांना दिले. 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची  बैठक जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी  श्रीरंग तांबे, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी वितरीत करण्यात आलेला निधी नियोजन करुन नमूद सूची नुसार खर्च करावा. मंदीर, यात्रा यांच्याशी संबंधित पुजारी व पदाधिकारी यांचे प्रशिक्षण, गावपातळीवर ग्रामसेवक व तलाठी तसेच माजी सैनिकांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. जिल्ह्यात जेसीपी, क्रेन आणि पोकलेन ऐनवेळी उपलब्ध व्हावे, यासाठी कॉन्ट्रक्टर, साखर कारखाने व उपप्रादेशीक कार्यालयाकडून यादी मागविण्यात यावी. जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील आराखडा तयार करावा. तसेच साखर, रसायनिक सर्व प्रकारचे  कारखान्यापासून भविष्यात होणारे धोके टाळण्यासाठी इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्राध्यापकांची माहिती घेऊन समितीची स्थापना करावी. निजामकालीन धोकादायक इमारतीचा सर्व्हेक्षण करण्याचे निर्देशही  डॉ. नारनवरे यांनी यावेळी दिले. या बैठकीचे प्रास्ताविक श्रीमती तेलोरे यांनी करुन सर्वांचे आभार मानले.  

 
Top