उस्मानाबाद - माणसाच्या मनातील हास्य दुर्मिळ होत आहे. अशावेळी सध्याच्या काळात आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांचे विनोदी लेखन निखळ आनंद देत आहे. जीवनात असे निखळ हास्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रख्यात लेखक आणि वक्ते प्रा. मिलींद जोशी यांनी केले. प्रा. जोशी यांनी सांगितलेल्या आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी किश्श्यांनी सभागृहातील प्रत्येकाला मनमुरादपणे हसवले. 
ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रा. मिलिंद जोशी यांचे आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे- विनोदाची दोन शिखरे या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी मानवी जीवनात विनोदाचे महत्व, जीवनात आलेला रटाळपणा आणि तोचतोचपणा टाळण्यासाठी विनोदाचे महत्व, विनोदाअभावी मानवी जीवनात निर्माण झालेले प्रश्न अतिशय मार्मिक आणि नेमक्या ओघवत्या शैलीत श्रोत्यांसमोर मांडले. आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदाची शैली परस्परविरोधी असली तरी मार्मिक होती. आचार्य अत्रेंच्या विनोदात रांगडेपणा होता तर पु. लं.च्या विनोदात शाब्दिक कोटी जास्त होती, असे त्यांनी सांगितले. 
प्रा. जोशी यांच्या नर्मविनोदी शैलीने सर्वांनाच खळखळून हसविले.  प्रत्येक माणसांला हसविण्यासाठी विनोद व साहित्यांचे लेखन करण्याचे काम आचार्य प्र.के.अत्रे आणि पु.ल.देशपांडे यांनी  केले. शाळेतील मुलांना शिक्षणांचा प्रसार व तणावमुक्त वातावरण राहण्यासाठी विनोदी लिखाण  काळाची गरज आहे. आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे यांचे किस्से ऐकतांना सर्वांचया चेहऱ्यावर हास्याची कारंजी फुलली होती. उस्मानाबादकर रसिक या विनोदी किश्श्यांमध्ये अक्षरश:  लोटपोट झाला होता. 
आचार्य अत्रे व पु. ल. यांनी जीवनातील संकटावर मात करुन कसा मार्ग काढायचा याचे कौशल्य विनोदात असल्याचे दाखवून दिले. त्यांचे विनोदी लिखाण समाजाच्या जडणघडणीत महत्वाचे होते. 
किस्से, हशा आणि टाळ्या असे समीकरण ग्रंथोत्सवातील विविध कार्यक्रमात अनुभवायला मिळाले.  प्रत्येक किश्श्यांला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद आणि हास्याचे फवारे याने सारे सभागृह दणाणून गेले. एक वेगळा अनुभव या व्याख्यानाच्या माध्यमातून श्रोत्यांना मिळाला. 
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव-2015 या ग्रंथोत्सवात येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृहात पुणे येथील प्रख्यात लेखक मिलींद जोशी यांनी आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे –विनोदाची दोन शिखरे या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अधक्ष ॲड. कुलदीप (धीरज पाटील), जिल्हा कोषागार अधिकारी  राहूल कदम, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे सचिव बालाजी तांबे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी  गजानन कुरवाडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.  
दिलखुलास व्याख्यानात प्रा. जोशी म्हणाले की, सतत लेखन, चिंतन,आणि वाचन केल्यामुळे मानवाचे जीवन समृध्द होतेच शिवाय आपल्या ज्ञानात भर पडते. विनोदी कथा, कांदबरी, साहित्यांमुळे समाज परिवर्तनाचे मोठे कार्य होते. वाचनामुळे बरेच काही शिकण्यासारखे आहे. प्रेक्षकांच्या आवडीच्या विषयांवर विनोद करत करत विविध प्रकारची हस्य विनोद करुन सर्वांकडून दाद मिळविली. जीवनातील शाळेत रमण्याकरिता जे-जे चांगले ते-ते वाचण्याचा जणू काय गुरुमंत्र त्यांनी दिला. प्रत्येक व्यक्तींने अत्रे व देशपांडे यांचे चरित्र  हातात घेऊन वाचन केले पाहिजे. साहित्य हे सामाजिक बांधिलकीसाठी संवादाचा पूल उभारण्याचे काम अत्रे व पु.ल. यांनी केले आहे. तंत्रज्ञानाद्वारे माणसाचा यंत्रमानव होऊ देऊ नका. तंत्रज्ञान व साहित्य वाचनाची कास धरा हेच आपले पसायदान आहे, असे प्रा. जोशी यांनी श्रोत्यांना सांगितले. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन संजय मैदर्गी यांनी केले तर आभार बालाजी तांबे यांनी मानले.     

 
Top