बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  रेल्वे विभागाडून नव्याने सुरु करण्यात आलेल्या सोलापूर - नागपूर एक्सप्रेस रेल्वेचे बार्शीतील प्रवाश्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. वर्षभरात अनेक वेळा पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांमध्ये विदर्भ, मराठवाड्यातील भाविकांची संख्या जास्त आहे. या रेल्वे
मुळे वारकर्‍यांना बार्शीतील भगवंताचे दर्शन घेऊन पंढरपूरकडे प्रयाण करणे सोयीचे होणार आहे.
याप्रसंगी भारतीय प्रवासी संघटनेचे विजय वाई, डॉ.लिमकर,राजगुरु, रेल्वे प्रवासी सेलचे शैलेश वखारिया, संभाजी घाडगे, अशोक धोका आदी उपस्थित होते.रेल्वेकडून या मार्गावर प्रायोगीत तत्वावर तीन फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत. दर बुधवारी दुपारी ३.२० वाजता सोलापूर स्टेशनहून सुटणार आहे. बार्शीत ५.३५ वाजता तर नागपूर येथे गुरुवारी दुपारी १२.३५ या वेळेत पोहोचेल. नागपूर येथून दर गुरुवारी दुपारी ३ वाजता सुटेल, शुक्रवारी सकाळी ८.२८ वा. बार्शीत तर ११.३५ वा.सोलापूर येथे पाहोचेल. सोलापूर -कुर्डूवाडी -बार्शी -लातूर -परळी -परभणी -वाशीम -अकोला -बडनेरा -वर्धा -नागपूर असा या मार्गावरील थांबा असेल. या वाहनामुळे प्रवाशांना नांदेडला जाण्यासाठी पुर्णापर्यंतची सोय होईल. अमरावतीला जाण्यासाठीही ही गाडी सोयीची असेल. या रेल्वेमुळे वाशीम, वर्धा, नागपूर या विदर्भाच्या प्रमुख केंद्राशी सोलापूर, बार्शी, लातूर आदी गावांना जोडल्याने चांगली सोय होणार आहे. या रेल्वेचा फायदा विदर्भ मराठवाड्यातील वारकर्‍यांना तसेच व्यापारवृध्दीसाठी होणार आहे.

 
Top