वैराग (महेश पन्हाळे): अगोदरच अपुर्‍या पावसामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने त्यांची अवस्था 'पेरलं तर उगवू देईना आणि उगवलं तर खाऊ देईना' अशी होऊन बसली आहे. गेल्या तीन वर्षांपासून अपुरा आणि अवकाळी पावसाच्या चक्रव्यूहात अडकले
ल्या बाश्री तालुक्यातील शेतकर्‍याला मागील वर्षी गारपीट मदत मिळाली होती. यावर्षी गारपीट नाही पण पावसाची संततधार कायम राहिल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करुन मदतीच्या रुपाने नुकसानीची तीव्रता कमी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.
बार्शी तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून द्राक्ष मणांना तडकण्याची शक्यता बळावली आहे. अशावेळी घडामध्ये पाणी राहून घड सडण्याची किंवा गळून पडण्याची शक्यता असते. त्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या पडण्याने बाजारपेठेमध्ये जाणारा द्राक्ष मालही थांबला असून आता दर ढासळण्याची भीती द्राक्ष उत्पादकांना भेडसावू लागली आहे. त्यात बेदाणा प्रक्रियाही होऊ शकणार नाही. आता बेदाणा केला तरी काळा पडतो व दर मिळत नाही. बार्शी तालुक्यामध्ये १२३0 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा पसरल्या आहेत. यापैकी २00 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचा माल उतरवला गेला असेल. बाकी सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पीक पावसात भिजले गेले आहे. द्राक्ष पिकापाठोपाठ ज्वारीला मोठा फटका बसला आहे. बार्शी तालुक्याची पेरणी उशिरा होते, त्यामुळे काढणीही उशिराच चालू होते. काढणी व मळणी चालू व्हायला आणि अवकाळी पाऊस कोसळायला गाठ पडल्याने ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सलग दोन दिवस पाऊस लागून राहिल्याने ज्वारीची काढणी, मळणी अडकून पडली आहे. उभी ज्वारी तर आडवीच झाली असून कणसांमध्ये माती गेली आहे. त्यामुळे ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्‍यांनी लगभगीने मंडवळी उभी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे गहू, डाळिंब, केळी, मका यांचेही नुकसान झाले आहे. द्राक्षे, ज्वारीपाठोपाठ आंबा पिकालाही फटका बसला असून मोहोर गळून पडल्याने आर्थिक नुकसानही मोठे झाले आहे. त्यात हवामान खात्याने गारपीट होण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये आहे. यापूर्वी वेळेवर पाऊस न पडल्याने पाणीटंचाईचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत होता. अशा परिस्थितीमध्ये कसेबसे पीक जगवून वाढवले असताना अचानक अवकाळी पावसाने याहीवर्षी दमदार हजेरी लावली. परिणामी शेतकर्‍यांना पाणीटंचाई आणि अवकाळी पाऊस या दुहेरी संकटाशी चार हात करावे लागत आहेत.
    बार्शी तालुक्यामध्ये जिल्हय़ात सर्वात उशिरा पेरणी होत असल्याने अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका बाशर्ी तालुक्याला बसला आहे. अजून ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४८ हजार हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी काढणी बाकी आहे. त्यामुळे या ज्वारीला मोठय़ा प्रमाणावर फटका बसला आहे.
पर्जन्यमापक केंद्रनिहाय नोंदवलेले पावसाचे प्रमाण
वैराग १६ मि.मी., नारी १३ मि.मी., आगळगाव ८ मि.मी., गौडगाव १0 मि.मी., खांडवी १५ मि.मी., बार्शी ८ मि.मी., सुर्डी १७ मि.मी., पांगरी ८ मि.मी., उपळे ५ मि.मी., पानगाव १३ मि.मी.
गेल्या दोन दिवसांपासून बार्शी तालुक्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षे, आंबा, ज्वारी, हरभरा, डाळिंब, गहू यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच आपल्याला नुकसानीचे प्रमाण कळेल.
- श्रीधर जोशी, तालुका कृषी अधिकारी

 
Top